लसीकरणासाठी अभियान चालवले जावे – नितीन गडकरी

नागपूर : ९ जून – कोविड संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. ही भीती दूर करून लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी एक अभियानच चालविले जावे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
प्रभाव्य इंडस्ट्रीजच्या ऑक्सीजन प्लाण्टच्या कोनशीला अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या आभासी कार्यक्रमाला उप्रचे उपमुख्यमत्री केशवप्रसाद मौर्य, ना. सिध्दार्थनाथ सिंग, ना. महेंद्रसिंग, उमेश जयस्वाल, वीरेंद्रसिंग आदी उपस्थित होते.
आमच्यातीलच एका कंत्राटदाराने हा प्लाण्ट सुरु करणे म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्यासारखे आहे. समाजाप्रती समर्पित भावनाने केलेले हे कार्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाण्टची आता आवश्यकता आहे. 50 बेडपेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयांना हवेतून ऑक्सीजन निर्माण करणारे प्लाण्ट सुरु करणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सिलेंडरची बँक सुरु व्हावी. सिलेंडर उपलब्धततेही आपण स्वयंपूर्ण असावे. कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरही उपयोगी आहे. ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरची बँक आम्ही सुरु केली आहे. या काळातच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असलेला पाहून या इंजेक्शनची निर्मिती करून लोकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. आता म्युकरमायकोसिसाठी लागणारे एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची निर्मिती करून हेही रुग्णांसाठी 1250 रुपयात उपलब्ध करून दिले. याशिवाय अॅम्ब्युलन्सही उपलब्ध करून दिल्या असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले.
आतापर्यंत कोविडच्या रुग्णांना आवश्यक असलेले 90 कोटी रुपयांचे वैद्यकीय साहित्य आपण वितरित केले असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले- तिसरी लाट आली तर आपली तयारी असावी म्हणून जिल्हाश: तयारी केली पाहिजे. लसीकरणाचे अभियान चालवणे आवश्यक आहे. हीच ईश्वरसेवा व हेच राजकारण आहे. सत्ताकारणाला आम्ही राजकारण समजतो. पण राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे, हाच आमचा उद्देश. पं. दीनदयालजी उपाध्याय यांच्या सामाजिक आर्थिक चिंतन आमची जीवननिष्ठा आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply