रामभाऊ खांडेकर स्वीय सचिव पदाचा मापदंड

सकाळी जाग आल्यावर रोजच्या सवयीने मोबाईल हातात घेतला उघडून बघताच एक मिस्ड कॉल दिसला म्हणून लगेच नंबर बघितला तर स्क्रीनवर राम खांडेकर हे नाव दिसले. ते बघताच मी लगेच कॉल बॅक केला. खांडेकरांच्या मुलगा मुकुंदनेच फोन उचलला आणि मी काही बोलण्याआधी लगेचच त्याने मला मध्यरात्रीच रामभाऊंचे निधन झाल्याचे बातमी दिली. बातमी अनपेक्षित नसली तरी धक्क्कादायक आणि दुःखद निश्चितच होती.
राम केशव खांडेकर हा नागपुरातील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय किराणा दुकानदाराचा मुलगा मात्र, स्वकर्तृत्वावर देशाच्या पंतप्रधानांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेला नागपूरकर. म्हणून माझ्यासारख्या त्यांच्या अनेक सुहृदांना त्यांच्या कर्तृत्वाचा निश्चितच अभिमान होता. त्याचबरोबर इतक्या मोठ्या पदावर पोहोचून निवृत्तीनंतर कोणतेही मोठे राजकीय पद न घेता निर्लेप आणि निरलंस जीवन जगणारा एक सत्पुरुष म्हणून सगळ्यांनाच त्यांचे कौतुकही होते.
माझे आणि रामभाऊंचे तर कौटुंबिक संबंध होते. मात्र ते बाजूला ठेवत त्यांच्या आयुष्यातील वाटचालीचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. त्यांचा माझा परिचय ते केंद्रीय मंत्री वसंत साठेंचे अतिरिक्त स्वीय सचिव म्हणून रुजू झाल्यावर झाला. सर्वसाधारणपणे केंद्रीय मंत्र्यांचा स्वीय सचिव म्हणजे कमाईची भरपूर संधी असते. त्याचबरोबर या पदावर काम करण्यासाठी उपजतच धुर्तपणा आणि ज्याला आजच्या भाषेत चालूपणा करण्याचे ज्ञान असणेही गरजेचे असते मात्र रामभाऊंनी आपल्या आयुष्यात या पदांचा उपयोग पैसे कमवण्यासाठी कधीही केला नाही. अगदी तरुणवयात ते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहायक म्हणून रुजू झाले. चव्हाणांसोबतच ते दिल्लीत गेले.. चव्हाणांनंतर मोहन धारिया, वसंत साठे, आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत त्यांनी काम केले. नोकरीतल्या शेवटच्या काळात ते पंतप्रधानांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. मात्र नरसिंहराव पंतप्रधान होईपर्यंत रामभाऊ दिल्लीतल्या लोधी कॉलोनी मधील आपल्या सरकारी क्वार्टरमधून शास्त्री भवन किंवा साऊथ ब्लॉकच्या कार्यालयात सायकलनेच जाणे येणे करायचे चव्हाण, नरसिंहराव आणि वसंत साठेंबरोबर ते अनेकदा नागपूरला यायचे केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सचिव म्हटल्यावर गाड्यांचा ताफा त्यांच्यासमोर उभा असायचा मात्र खासगी कामासाठी त्यांनी कधीही सरकारी किंवा एखाद्या लाभार्थ्यांची गाडी वापरली नाही. नागपुरातही ते आपल्या पुतण्याची सायकल घेऊनच फिरायचे.
सरकारी पगार व्यतिरिक्त कोणत्याही पैश्याला शिवायचे नाही आणि कोणत्याही अतिरिक्त सवलती मिळवायच्या नाही हे तत्व घेऊन जगणारे रामभाऊ कामाला मात्र वाघ होते. सरकारी कायदे नियम प्रथा परंपरा यांचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. त्यामुळे मंत्र्याकडे आलेल्या कोणाचेही काम नियमांच्या चौकटीत बसवून कसे करायचे याचे सूत्र त्यांना गवसले होते. येणाऱ्या प्रत्येकाचे काम करता कसे येईल हाच त्यांनी प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना त्यांनी कधीही आपल्या कामाची आणि ज्ञानाची आढ्यता आणि अहंमन्यता दाखवली नाही. येणाऱ्या प्रत्येकाशी ते प्रेमानेच वागायचे. त्यामुळे मंत्र्यांचा जनसंपर्क आपसूकच सांभाळला जायचा.
जसे मंत्र्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रामभाऊ सांभाळून घ्यायचे तसेच शासनातल्या विविध सहकाऱ्यांनाही ते सांभाळून घ्यायचे. डिव्हिजनल कमिश्नर असो की तहसीलदार प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे अनेकांची कामे ते फक्त शब्दावर करायचे खांडेकरांचा एक विनंतीवजा फोन जरी गेला तरी राज्याचा मुख्य सचिवसुद्धा स्वतः लक्ष घालून काम करीत असे. आपल्या कार्यकाळात मंत्र्याकडे जे खाते असेल त्याचा इतरांना फायदा कसा करून देता येईल त्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. नरसिंहराव मानव संसाधन विकास मंत्री असताना अनेक गुणी मराठी व्यक्तींची नावे विविध पदांसाठी आणि विविध पुरस्कारांसाठी त्यांनी सुचवली. या सूचनांचा त्यांनी पाठपुरावाही केला. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला.
१९९१ मध्ये नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी खांडेकरांना आपले विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमले. या काळात बाबरी मशिदीचे पतन, हर्षद मेहताचा कर्ज रोखे घोटाळा, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रकरण अशी विविध प्रकरणे गाजली मात्र, खांडेकरांचे स्वच्छ चारित्र्य बघता कुणालाही त्यांच्याकडे बोट दाखवण्याची हिम्मत झाली नाही. हर्षद मेहताने तर त्यांच्यावर उघड आरोप केले होते पण शेंबड्या पोरानेही त्यावर विश्वास ठेवला नाही. हीच खरी रामभाऊंची कामे होती.
नरसिंहराव पंतप्रधान पदावरून पायउतार झाले तेव्हा रामभाऊंच्याही निवृत्तीची वेळ आली होती. यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता रामभाऊंनी पंतप्रधान कार्यालयात निवृत्तीनंतर विशेष बाब म्हणून कार्यरत राहावे असा आग्रह होता, मात्र निवृत्तीनंतरही रामभाऊंनी पंतप्रधान नसलेल्या नरसिंहरावांनाच सेवा देण्याचे ठरवले. अन्यथा अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्याही कार्यालयात ते काम करतांना दिसले असते. तब्बल ९ वर्ष त्यांनी नरसिंहरावांना सेवा दिली.
नरसिंहरावांच्या निधनानंतर त्यांनी दिल्ली सोडून नागपुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा मुकुल मुंबईत स्थायिक झाला होता. त्यानंतर हे नागपुरात अखेरपर्यंत मुक्कामी होते.
उत्तम प्रशासक असलेले रामभाऊ चांगले लेखकही होते. त्यांनी निवृत्तीननंतर अनेक नियतकालिकांमध्ये लेखन केले. चार मंत्र्यांसोबतच्या कार्यकाळावर त्यांची एका दैनिकात सुरु असलेली सत्तेच्या पडछायेत ही लेखमालिकाही प्रचंड गाजली. ही लेखमालिका पुस्तक रूपातही प्रकाशित झाली आहे.
असा हा अनेक मान्यवर मंत्र्यांना सेवा देणारा आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक घडामोडींमध्ये सहभाग असणारा कर्तृत्वसंपन्न माणूस वयाच्या ८७व्या वर्षी सर्व सहृदांना दुःखात लोटून निघून गेला आहे. यानंतर पंतप्रधान अनेक येतील त्यांचे स्वीय सचिव आणि विशेष कार्य अधिकारीही अनेक येतील मात्र रामभाऊ खांडेकर हे रामभाऊंचं होते. मंत्र्यांचा किंवा पंतप्रधानांचा स्वीय सचिव कसा असावा याचा मापदंडच रामभाऊंनी तयार करून दिला होता आणि त्या मापदंडाच्या चौकटीतच ते स्वतः आयुष्य जगले.
रामभाऊंना विनम्र आदरांजली
अविनाश पाठक

Leave a Reply