नागपुरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश

नागपूर : ९ जून – उपराजधानी नागपूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नागपुरातील दवाखान्यांमधील खाटा, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेडच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आठपटीने म्हणजेच 989 बेडवरून 7 हजार 730 बेडची वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरी लाटेवर केवळ एका महिन्यातच नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा टास्क फोर्सची निर्मिती करणे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना याच्या निर्देशनानंतर आरोग्य सुविधांमध्ये तात्काळ वाढ करण्यात आली. शहरातील खासगी डॉक्टरांशी चर्चा करून खासगी दवाखान्यांमध्ये वाढीव बेडची मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
एप्रिल 2020मध्ये नागपुरात केवळ 805 ऑक्सिजन बेड होते. आता ऑक्सिजन बेडची संख्या 4810 एवढी आहे. आयसीयूमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 92 टक्क्यांनी बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नागपुरात आयसीयू बेड केवळ 184 होते. आता या बेडची संख्या 2314 वर पोहोचली आहे. नागपुरात गेल्या वर्षी व्हेंटिलेटरची संख्या केवळ 87 होती. आता व्हेंटिलेटर 579 एवढे उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक लागली. एप्रिल 2020 मध्ये नागपुरात केवळ 58 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होता. आता नागपुरात 160 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे.
या कोरोनाच्या काळात केवळ प्रशासकीय अधिकारी पदाधिकारीच नाही तर नागरिकांचीही साथ लाभली. केवळ एक वर्षाच्या कालावधीत आरोग्य सुविधांमध्ये आठपटीने वाढ करणे ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु महाविकास आघाडीचे धोरण व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यात जे काही यश मिळाले ते या सर्वांचे आहे, असे मत पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

Leave a Reply