यवतमाळ : ९ जून – उपसरपंचाने कर्तव्यावर असलेल्या दोन आशा सेविकांवर धारधार सुऱ्यांने प्राणघातक हल्ला केला आहे. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे घडला. यात कालिंदी उईके आणि गंगा कुमरे या आशा सेविका जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायतखर्डा येथील उपसरपंच मधुसूदन मोहुर्ले (५५) याने आशा सोविकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात कालिंदी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गंगा कुमरे यांच्या हातालाही गंभीर मार लागला आहे.
मधुसूदन मोहुर्ले याला दारूचे व्यसन आहे. काही ना काही कारण शोधून तो या आशा सेविकांना त्रास देत होता. गेल्या आठ दिवसांपासून मधुसूदन हा आशा सेविकांचा पाठलाग करीत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. दरम्यान, पारवा पोलिसांनी उपसरपंच मधूसुधन मोहुर्ले याला अटक केली असून त्याच्याविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.