उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी भाजपात केला प्रवेश

लखनौ : ९ जून – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा बडा नेते जितीन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितीन प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रसाद म्हणाले की, जर आज खर्या अर्थाने या देशात कोणताही पक्ष असेल तर तो भाजप आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून फक्त एकच आणि एकच भाजप आहे.
पुढे ते म्हणाले की, कोणता पक्ष सोडला हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पक्षात प्रवेश केला हे जास्त महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये प्रवेश करणं हा माझा एक विचारपूर्वक निर्णय आहे.
त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देशाची प्रगती होत आहे, त्यांचा विजय आहे, असंही रेल्वेमंत्री म्हणालेत.
जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला एक झटका आहे. प्रसाद यांच्या प्रवेशाआधीच भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बलूनी यांनी ट्विटद्वारे काँग्रेसचा मोठा चेहरा पक्षात प्रवेश करणार असल्याचं संकेत दिले होते. भाजपमध्ये येण्यापूर्वी जितिन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली होती.

Leave a Reply