संपादकीय संवाद – उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांसोबत वेगळी भेट कशासाठी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसरकारच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील एक सहकारी आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. ही भेट मुख्यतः मराठा आरक्षण प्रकरणात होती असे सांगण्यात आले. यानंतर उद्धवपंतांनी नरेंद्रभाईंची वेगळी भेट घेतली आणि त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या चर्चेमुळे राजकीय चर्चांचे आणि आडाख्यांचे पेव फुटले आहे.
ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि भाजप आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण केली गेली. यादरम्यान उद्धवपंत कधीही नरेंद्रभाईंना भेटले नव्हते आधी उद्धवपंत नरेंद्र मोदींना मोठा भाऊ म्हणायचे तर नरेंद्र मोदी त्यांच्या लहान भाऊ म्हणून उल्लेख करायचे मात्र,महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावा या मुद्द्यावरून या दोन भावांमध्ये नको तेवढे वाजले. आणि दोघांनीही एकमेकांना भेटणे बंद केले होते. त्याचवेळी जर उद्धवपंत मोदींशी फोनवरून बोललोय असते तर हे प्रकरण इतके ताणले नसते आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेत आले असते असेही म्हटले जात होते. त्यावेळी नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी का कु करणारे उद्धवपंत आता एकदम पंतप्रधानांशी एकट्यात बोलण्यामागे नेमके काय रहस्य दडले आहे यावर राजकीय वर्तुळात खल सुरु आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धवपंतांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी जी महाआघाडी बनवली गेली ती निश्चितच अनैसर्गिक आणि अनैतिक आघाडी होती असा आरोप केला गेला होता. ते वास्तवही होते त्यामुळेच सत्तेसाठी एकत्र आलेले तीनही पक्ष साहजिकच सत्तेच्या लोण्यातील जास्तीत जास्त हिस्सा कसा मिळवता येईल यावरच भिडलेले होते. आजही सर्वजण लोणी कसे पळवता येईल याच फिकीरीत असल्याचे दिसून येते त्यामुळे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी परिस्थिती दिसते आहे. त्यात कधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना धारेवर धरते तर कधी शरद पवार नाराज असल्याचे सांगितले जाते आजकाल मुख्यमंत्री शरद पवारांना फारसे महत्व देत नाहीत असेही बोलले जाते. अश्या परिस्थितीत पवार केव्हाही हे सरकार पाडू शकतील अश्या अटकळी बांधल्या जात आहेत. पवारांचा आजवरचा इतिहास बघता ते अशक्यही नाही. त्यामुळेच ही बंदद्वार चर्चा उद्धवपंतांनी घडवून आणली असावी असेही अंदाज लावले जात आहेत.
मात्र अश्या परिस्थितीत नरेंद्र मोदी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंशी पुन्हा समजोता करतील काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे. गेल्या दीड वर्षात शिवसेनेच्या तोंडाळ प्रवक्त्यांनी भाजप नेत्यांना इतके दुखावले आहे की मोदी किंवा अमित शाह हे महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार बनवतील असे आजतरी वाटत नाही. प्रसंगी फोडाफोडी करून भाजपमध्ये नवे भिडू आणतील किंवा प्रसंगी मध्यावधी निवडणुकांना सामोरे जातील पण शिवसेनेबरोबर जाणार नाही असे याक्षणीचे तरी चित्र दिसते आहे.
तरीही उद्धवपंतांनी बंदद्वार चर्चा केली त्यामुळे अटकळींना जोर आलेला आहे. या भेटीतून नक्की काय पुढे येईल ते भविष्यकाळच सांगेल तोवर अटकळी बंधने एवढेच आपल्या हातात आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply