जातपंचायतीने टाकलेला बहिष्कार मरणानंतरही कायम, मुलींनी खांदा देऊन केला अंत्यसंस्कार

चंद्रपूर : ८ जून – घरी अठरा विश्वे दारिद्रय़ असल्याने गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांना समाजातील लग्न, समारंभ व कार्यक्रमांना जाणं शक्य नसल्याने जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार घातला. विशेष म्हणजे, हा बहिष्कार अखेरच्या श्वासापर्यंत होता. प्रकाश ओगले यांची दीर्घ आजारानंतर प्राणज्योत मालवली. तेव्हा अंत्यसंस्कारासाठी समाजातील कुणीही समोर आले नाही. त्यामुळे सात मुली व दोन मुलांनी खांदा देऊन वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले.
उपेक्षित, शोषित व पीडित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र आणले, त्यांचा उद्धार केला, मात्र आजही देशात जात पंचायती अस्तित्वात आहेत. साक्षरतेच्या युगात जातपंचायतीचे निर्णय निरक्षरतेचे उदाहरण म्हणून समोर येत असतात, चंद्रपूर शहरात सुद्धा असेच एक उदाहरण समोर आले आहे. जातपंचायतीच्या जाचामुळे वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्यास कुणी तयार नव्हते, जर कुणी पार्थिवाला खांदा दिला तर त्याला जातीच्या बाहेर काढले जाणार असा फतवाच जातपंचायतीने काढला, अशातच मृत प्रकाश ओगले यांच्या कुटुंबातील मुलीने स्वत: वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत जातपंचायतीच्या तुघलकी निर्णयापुढे उभे राहिल्या. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्डातील ही घटना आहे. रविवारी प्रकाश ओगले यांच्या मृत्यू होताच, नातेवाईकांना कळवण्यात आले. मात्र १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जातपंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आडवा आला. गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पदरी ७ मुली आणि २ मुलं. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं, परिणामी समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घालत आर्थिक दंड ठोठावला. मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही कायम राहिला. मात्र त्यांच्या जयश्री या मुलीने जातपंचायतीला सणसणीत चपराक लगावत आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. गोंधळी समाजाच्या जातपंचायतीच्या या जाचाविरुद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडणे, बहिष्कार टाकणे आणि त्या माध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसवण्याचे काम जातपंचायत करते. सध्या विदर्भात ३५ कुटुंबं अशाप्रकारचा जातपंचायतीचा बहिष्कार भोगत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलींनी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर माध्यमांशी बोलताना, जात पंचायतीने त्यांच्या वडिलांवर कशा पद्धतीने बहिष्कार घातला, तसेच मागील अनेक वर्षांपासून कशा पद्धतीने बहिष्काराच्या यातना भोगतो आहे, याचे कटू सत्य मांडले. बहिष्कारापासून मुक्ती मिळवायची असेल तर दंड भरावाच लागेल, मात्र गुन्हा केलाच नाही तर दंड कशाचा भरायचा, असाही प्रश्न या भावंडांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply