आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील – अमोल मिटकरी

अकोला : ८ जून – मराठा आरक्षणासह राज्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक शंका देखील उपस्थित केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या अनुषंगानं मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘महाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत असल्यानं चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, कमालीची अस्वस्थ झालेली पाटील-फडणवीस ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशी भीती मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शंकेला आधार म्हणून मिटकरी यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याकडं लक्ष वेधलं आहे. ‘मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या बैठकीला सुरुवात होण्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप हा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा त्यांच्याकडं दुसरं काही शिल्लक नाही,’ असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply