पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओसरल्यास संघ परिवार त्यांचा अडवाणी करेल असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे. त्यांचे हे पत्रक कालच माध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे. संघात कोणत्याही व्यक्तीला एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा मोठे होऊ दिले जात नाही तसेच गरज सरो वैद्य मरो तत्वानुसार प्रभुत्व गमावणाऱ्या व्यक्तीला संघ बाजूला सारतो अशी टीका गाडगीळांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील कार्यालय माझ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करता येतो असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
गाडगीळांनी जे म्हटले आहे ते संघात होत असेल तर काँग्रेसमध्ये काय वेगळे होते. याचेही उत्तर गाडगीळांनी शोधायला हवे काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा कोणीही वरचढ होऊ नये यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन करण्यात आले होते. हे गाडगीळ खासगीत मान्य करतील. इतकेच काय तर अनंतरावांचे तीर्थरूप स्वर्गीय विठ्ठलराव हे मोठे होऊ नये यासाठी शरद पवारांनी काय प्रयत्न केले होते आणि त्यांना कोणाचे आशीर्वाद होते हे पुण्यातला कोणीही राजकीय अभ्यासक सांगेल. वसंत साठे विठ्ठलराव गाडगीळ हरिभाऊ गोखले, हे काँग्रेसमधील मराठी चेहरे कोणत्या पातळीवर पोहोचले होते आणि त्यांची पातळी घसरतच आणि उपयुक्तता संपताच काँग्रेसने या नेत्यांना कसे अडगळीत टाकले हा इतिहास अनंतराव कदाचित विसरले असतील मात्र महाराष्ट्राला आजही ज्ञात आहे. निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता संपली की कोणताही पक्ष अश्या नेत्याला नेतृत्व करण्यापासून दूर करतोच ही जगाची रीत आहे.
अडवाणींबद्दल बोलायचे झाले तर पक्षाने त्यांना वाजपेयींच्या काळात उपपंतप्रधान केले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित केले होते. त्यानंतरही अडवाणी विजय मिळवून देणारा व्हेंचर राहिला नाही असे लक्षात आल्यावर भाजपने नवा प्रयोग केला. तर त्यात काय चुकले? असे असले असले तरी भाजपने आजही त्यांना सन्मानाने खासदार बनवले आहेच देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून दोनदा सूत्रे स्वीकारणारे ज्येष्ठ काँग्रेसशी नेते गुलजारीलाल नंदा यांची उपयुक्तता संपल्यावर काँग्रेसने त्यांचे काय हाल केले होते आणि पंतप्रधानपदावरून खाली उतरल्यावर पी. व्ही. नरसिंहराव यांना त्यांच्या मृत्यूनंतरही काँग्रेसने कसे आणि किती अडगळीत टाकले याची पुरेपूर कल्पना अनंतरावांना आहे तरीही भाजपवर टीका करणे ही त्यांची मजबुरी आहे ती आपण समजून घ्यायलाच हवी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील मोतीबाग कार्यालय हे गाडगीळांच्या घराजवळ असल्यामुळे त्यांना संघाचा चांगला अभ्यास करता येतो असा दावा गाडगीळ करतात. मात्र संघाचा अभ्यास करायचा असेल तर तो संघ कार्यालयात जाऊन करता येणार नाही त्यासाठी संघाच्या शाखांना भेटी द्याव्या लागतील आणि सर्व स्तरातील स्वयंसेवकांशी संवाद साधावा लागेल काँग्रेस पक्षातल्याच तुम्हाला होत असलेल्या अंतर्विरोधाला तोंड देता देता तुम्हाला हजारो स्वयंसेवकांशी संवाद साधायला वेळ मिळेल असे वाटते काय अनंतराव?मग संघाचा अभ्यास केल्याचा दावा का करता?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या निवृत्त प्रचारकांना त्यांचे हातपाय थकल्यावर संघ कार्यालयातच त्यांची संपूर्ण व्यवस्था करतो अखेरपर्यंत अश्या प्रचारकांना संघ थिन्क टॅंक म्हणून जपतो. काँग्रेसने जसे गुलजारीलाल नंदांना दिल्लीतल्या डिफेन्स कॉलनीतल्या एका चरखोल्यांच्या घरात एकाकी सोडले होते तसा प्रकार संघात होत नाही इतकेच शेवटी जाता जाता सांगायचे आहे अनंतराव. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या भांडणात तुम्ही संघाला शिंगावर घेऊ नका.
अविनाश पाठक