राज्य सरकारने आधी डिझेल आणि पेट्रोलवरील कर कमी करावे मग केंद्राकडे मागणी करावी – चंद्रकांत पाटील

पुणे : ७ जून – राज्यातील नेते इंधनाची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने दर कमी करावे, अशी मागणी करतात. मात्र, ज्या राज्यातील इंधन दर कमी आहेत, त्यांनी राज्यात लागू होणारे कर कमी केले आहेत. राज्याने केंद्राकडून पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीची मागणी करावी पण, त्यापूर्वी स्वतः कर कमी करावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्राह्मण आघाडीच्यावतीने दिव्यांग कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये प्रत्येक विषयात गोंधळ आहे. या सरकारच्या कार्यकाळात एकदाच विरोधी पक्षाची बैठक झाली आणि त्याबैठकीत आम्ही म्हटले की यात वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. दिशा ठरवली पाहिजे. घोषणा कोणी एकाने केली पाहिजे. पण, या सरकारमध्ये प्रत्येकालाच घाई झाली आहे की मी कधी घोषणा करतो. सरकारने राज्यातील विविध नेत्यांची बैठक बोलावून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे यावेळी पाटील म्हणाले.
नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत गेल्यानंतर ही त्यांनी खरे बोलावे.आम्ही काहीही अस्वस्थ नाही पण आम्ही दुःखी आहोत की आम्हला धोका झाला. आम्हाला फसवले याच आम्हाला दुःख आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे पाटील म्हणाले.

Leave a Reply