मुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकलले, एका मुलीचा मृत्यू

भोपाळ : ७ जून – मुलगा होत नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नी आणि मुलींना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला आणि सहा महिन्याची मुलगी यामध्ये वाचली असून एका मुलीचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे हा प्रकार घडला आहे. रविवारी संध्याकाळी पती आपल्या पत्नीला माहेरुन घरी आणत असताना ही घटना घडली.
घरी जाण्याऐवजी पती पत्नीला घेऊन एका विहिरीजवळ गेला. त्याने तिथे आपली दुचारी पार्क केली आणि नंतर पत्नी आणि मुलींना विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यानतंर पत्नी आणि मुली मदत मागत असताना त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
दरम्यान महिला आपल्या तीन महिन्याच्या मुलीला वाचवण्यात यशस्वी ठरली. महिला आपल्या एका मुलीला घेऊन विहिरीबाहेर आली, मात्र मोठ्या मुलीचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर स्थानिकांच्या मदतीने महिलेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या पतीविरोधात पोलीस तक्रार दिली.
पती गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी देत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply