डीएनए रिपोर्टच्या मदतीने पोलिसांनी उलगडले दीड वर्ष जुन्या खुनाचे रहस्य, दोन आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून – चित्रपटात शोभेल अशी थरारकथा एमआयडीसी पोलिसांनी डीएनए रिपोर्ट आणि इतर तपासावरून उघड केली. १२ डिसेंबर २0१९ ला बेपत्ता झालेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलाचा खून करून त्याचे तुकडे इतरत्र फेकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, हे स्पष्ट झाले. तसेच एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या कार्यकुशलतेने दोन आरोपींना बिहार येथून अटक केली.
२१ डिसेंबर २0१९ ला एमआयडीसी हद्दीत आय.सी. चौक, तकियावाले बाबा दर्गाजवळ राहणारा १७ वर्षांचा दिनेश ऊर्फ मलिंगा शंकर पासवान हा बाजारात जातो, असे सांगून घरून निघून गेला होता. पण, तो परतच आला नाही. या प्रकरणी ९ जानेवारी २0२0 ला एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ११ नोव्हंबर २0२0 ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जुन्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कागदपत्र पाहिले असता, त्यांना अपहृत मुलाबद्दल माहिती मिळाली. बेपत्ता असलेल्या मुलावर ११ गुन्हे दाखल असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली. १६ आणि १७ जानेवारी २0२0 ला मेट्रो स्टेशनमागील पहाडावर कवटीचे तुकडे, हाडाचे तुकडे, चार दात आणि काही कपड्याचे तुकडे मिळाले होते. त्याला शरीररचना विभागाकडे पाठविण्यात आले होते. या प्रकरणात शरीररचना विभागाकडून अहवाल प्राप्त झाला. ते अवशेष अपहृत मुलाचे असल्याचा अंदाज बांधत पोलिस पथकाने त्याच्या आई व वडिलांचे डीएनए नमुने घेऊन तपासणीला पाठविले. त्याच्या अहवालानुसार, तो मुलगा त्यांचाच बेपत्ता झालेला मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्या मुलाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्या खुन्यांचा तपास सुरू झाला. पोलिस उपायुक्त नरूल हसन यांच्या मार्गदर्शनात दोन तपास पथके तयार करण्यात आली. त्यांना माहिती मिळाली की, हा खून मोठा घी, छोटा घी आणि कॉकरोच यांनी केला आहे. त्यानंतर आरोपींची माहिती घेऊन आणि पुरावे व साक्षीदार तपासून आरोपी चंदन ऊर्फ छोटा घी शिवपूजन शाह (१९) रा. कार्तिकनगर झोपडपट्टी, कुणाल ऊर्फ कॉकरोच राजगिरी प्रसाद (१९) रा. भीमनगर हे बिहार येथे गेल्याचे समजले. सहाय्यक पोलिस निरीक्षक हत्तीगोटे यांचे पथक बिहार येथे रवाना झाले. त्यांनी आरोपी कॉकरोच याला आरानगर जिल्हा भोजपूर येथून ताब्यात घेतले. आरोपी छोटा घी याला सातपूर जि. सारन येथून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी आरोपींची ११ जून पर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Leave a Reply