हिंदू साम्राज्य दिनोत्सव !

आज शिवसाम्राज्य दिनोत्सव !शिवराज्याभिषेकाचे प्रेरणादायी स्मरण ! इतिहासातल्या विजयी परंपरा समाज मनाला उभारी देतात.मरगळलेल्या मनांवरचे मालिन्य झटकून नवोन्मेषाने पुन्हा झुंजण्याची प्रेरणा देतात.अवतीभोवतीच्या अस्वस्थ वर्तमानाच्या पोटी उद्याच्या उज्ज्वल भविष्याची रेखाचित्रे साकारण्याचं बळ अशा पुण्यस्मरणानं मिळतं. म्हणून आठवायचा शिवराज्याभिषेकाचा पराक्रमी सोहळा.कारण या सोहळ्याने शेकडो वर्षे निद्रावस्थेत मृतप्राय जगणाऱ्यांना आयुष्याची नवी प्रेरणा दिली.
ती घटनाच युगप्रवर्तक होती.साडेतीनशे वर्षांपूर्वी या मातीतल्या एका मराठमोळ्या मुलाला एक स्वप्न पडलं.स्वप्नांना पोषक असं काही उरलंच नव्हतं या भूमीत.आपल्याच मायभूमीत लेकरे दास होऊन पडली होती. आसेतुहिमाचल देश आहत अन् विच्छिन्न होऊन पडला होता.सर्वत्र अंधार दाटला होता. माता भगिनी परकीय विलास मंदिरात लुटल्या जात होत्या.सारे सत्व आणि स्वत्व जणू परपोषणासाठीच पणाला लागले होते.स्वातंत्र्य हरवल्याची खंत नव्हती. वतनाच्या तुकडयासाठी साऱ्या देशाचा सौदा समाजातील पराक्रमी माणसे करीत होते.सर्वत्र मन मारून टाकणारे दृश्य होते. धर्म आक्रंदत होता. मंदिरे उद्ध्वस्त होत होती.अबला जनानखान्यात खेचल्या जात होत्या.तेजोभंग कधीचाच झाला होता.परसेवा हीच आकांक्षा आणि परदास्य हाच धर्म झाला होता.परवशतेच्या शृंखलेलाच वैजयंती मानून तिची चुंबने घेण्यात समाजातला जाणता वर्ग गर्क होता.आणि सामान्य माणसे..? ती तर मृतप्राय,मृतकल्प झाली होती.दुसरे कोणी जाऊ द्या,खुद्द शहाजी महाराजांची चुलत वहिनी,खेळोजी भोसले यांच्या पत्नीला गोदा स्नानावरून महाबतखानाने पळवून नेले.महाराष्ट्राच्या मुर्दाड मनावर साधा ओरखडाही उमटला नाही. सर्वत्र निराशा !अंधकार ! कर्तव्यशून्यता आणि सत्वशून्यता ! दिव्य स्वप्नांची विजिगीषू परंपरा केव्हाच खंडित झालेली.
अशा वेळी या मुलाने भव्यदिव्य स्वप्न पाहिले.त्याच्या साऱ्या कर्तुत्वाचा आधारच हे जिजीगीषू स्वप्न होते.हे स्वप्न मोगलांची मनसबदारी करणारे नव्हते,अधर्म राज्याच्या सेवेचे नव्हते.आपला पराक्रम पौरुष सत्तेच्या तुकड्यासाठी विकण्याचे नव्हते ; ते स्वप्न विजयाचे होते ! राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे होते ! विजयशाली परंपरेच्या पुन:प्रतीष्ठापनाचे होते ! हे स्वप्न एका परगण्याच्या वतनाच्या प्राप्तीचे नव्हते.पश्चिम महाराष्ट्राच्या राज्याचे वा केवळ मराठी मातीच्या मुक्तीचे नव्हते. ते आसेतुहिमाचल हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्वप्न होते.काम कठिण होते.कल्पनेलाही धाप लागावे इतके कठीण.प्रेतात प्राण भरण्याइतके दुष्कर.हा देश तेव्हा जिवंत प्रेतांनीच तर भरला होता. ही मृतप्राय माणसं उभी करण्याचे काम शिवरायांना करावयाचे होते.शिवाजींनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र या प्रेरणा या माणसांमध्ये जागवल्या.आपल्या भव्यदिव्य सजीव स्वप्नांचा रंग त्यांनी या मृतकल्प मनांमध्ये भरला.कोणताही रंग, रूप,आशय,आकार,अस्तित्व नसणाऱ्या सामान्य माणसांना त्यांची ओळख पटवून दिली.तुम्ही कोण याचे भान त्यांना दिले.स्वसामर्थ्याचा साक्षात्कार झालेली ही आत्मविस्तृत माणसे मग अभिमानाने गाऊ लागली..

आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे
उजळून टाकू जगती भवितव्य मातृभूचे
पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे
नुरले निशाण त्यांचे आता जगात कोठे
गेली सहस्त्र वर्षे लढलो थांबताही
गजनी सिकंदराची उरली न मृत्तीकाही
आम्ही कालकूट प्यालो आम्हा मरण कैसे आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे

या स्वप्नांनी पेटलेल्या माणसांनी मग अशक्य ते शक्य करून दाखवले.सिंहासने गडगडली.मानचित्रांच्या रेषा भराभर पालटल्या.पाताळात गाडले गेलेले सार्वभौम हिंदवी सिंहासन पुन्हा सह्याद्रीच्या शिखरावर उदीयमान झाले.पराक्रमाने व धर्म तेजाने तळपणारा प्रति सूर्य त्या सिंहासनावर आरुढ झाला.या सिंहासनाला आधार होता धर्म प्रेमाचा, न्यायाचा, नीतीचा,सहिष्णुतेचा,पूर्वज परंपरेचा, पराक्रमाचा,हौतात्म्याचा आणि सामान्य रयतेच्या प्रेमाचा !
हे सिंहासन उदयाला आलं आणि दिशा उजळल्या.धरणी पुलकित झाली अन् तिच्या आश्रयाने राहणारी सामान्य माणसे थरारून उठली.त्यांना जीवनाचा अर्थ सापडला.स्वाभिमान गवसला. स्वपराक्रमाचा शोध लागला. शतकानुशतके खिन्न आनंदवनभुवन आता खरोखर आनंदरूप झाले.
शिवरायांचे सारे जीवनच अलौकिक.आयुष्यातील प्रत्येक घटना चित्तथरारक आणि व्यक्तित्व विकासाची पाठशाळाच जणू.डोळ्यात स्वप्न,हृदयात ज्वाला, डोक्यावर बर्फ,तोंडात साखर आणि पायाला भिंगरी बांधूनच घडलं हे सर्वार्थाने आदर्श आणि अलौकिक व्यक्तिमत्व.
मला शिवचरित्रातील पराक्रमपर्वा सोबतच महाराजांच्या निर्वाणानंतरची एक घटना विलक्षण वाटते.छत्रपती शिवराय आणि त्यांचे सिहासन ही किती अद्भुत प्रेरणा आहे याचे ही घटना खरा परिचय आहे.थोरल्या महाराजांचे निर्वाण झाले आहे..धर्मवीर संभाजी महाराजांचेही स्वराज्यासाठी हौतात्म्य झालं आहे..आणि आता स्वराज्याला चिरडून टाकण्यासाठी खुद्द पातशहा औरंगजेब सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रात उतरला आहे. १६९१ ते १७०७..तब्बल सतरा वर्षाची काळरात्र ! ही सतरा वर्षे या मातीतला सामान्य माणूस,कुठलाही नेता,सेनापती,साधनसामग्री,शस्त्रे काहीही जवळ नसताना क्रूरकर्म्या औरंगजेबाशी लढतोय.. केवळ आणि केवळ शिवप्रेरणेच्या बळावर ! त्या दिव्य सिंहासनाच्या स्मरणाच्या आधारावर ! जय भवानी जय शिवाजी या तारक मंत्राच्या उद्घोषाच्या आधारे तो बलाढ्य औरंगजेबाचे थडगे इथे उभारतो.. जगाच्या इतिहासात असा प्रसंग असा दुसरा प्रसंग नाही. सामान्य माणसाच्या पराक्रमाची ही गाथा केवळ अद्भुत,एकमेवाद्वितीय आहे.शिवछत्रपतींचा तो खरा परिचय आहे.
म्हणूनच प्रत्येक हतवीर्य समाजाला पुन्हा उभं करण्याचं अलौकिक सामर्थ्य शिवस्मरणात,शिव साम्राज्य दिनोत्सवाच्या पुण्यस्मरणात आहे.प्रत्येक भारतीयाने स्मरण करावं त्या अद्‍भुत सिंहासनाचं.हजारो वर्षे प्रेरणा देणाऱ्या त्या काल प्रवर्तक घटनेचं. त्या लोकविलक्षण स्वप्नाचं. अवतारी प्रतिभेला स्फुरणारे आणि सामान्य माणसाच्या भवितव्याचा कायापालट करणारे ते स्वप्न आहे.अशी उदात्त, भव्य दिव्य आणि प्रेरक स्वप्ने आणि घटनाच माणसांना आणि राष्ट्राला जगवितात आणि जागवतात.प्रेरणा आणि प्रगतीची परंपरा अक्षय राखतात..प्रेरक परमेश्वरी अस्तित्वाची ग्वाहीही देतात !

आशुतोष अडोणी

( आर्त अनावर या पुस्तकातील लेख )

Leave a Reply