मुंबई : ६ जून – शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्यास गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला होता. याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत? अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहील अशी कार्यवाही सरकारने करावी, अशी टीका शिवसेना खासदार यांनी संजय राऊत यांनी केली आहे.
भगवा झेंडा शासकीय कार्यालयावर फडकवणे हे आपले साऱ्यांचे स्वप्न आहे. भगवा झेंडा फडकवल्याने तिरंग्याचा अपमान होण्याचा प्रश्नच नाही. भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला. भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. वीर सावरकरांपासून ते भगतसिंह, सुखदेव, राजगुरूंपर्यंत सर्वांच्या पाठीशी भगव्याची प्रेरणा होती. ज्यांना भगव्याचे महत्त्व कळत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही”, असे राऊत यांनी सांगितले.
खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेनाचे चित्र उभे झाले होते. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, “खेडमध्ये घडलेला विषय हा केवळ खेडपुरता मर्यादित आहे. खेडमधील आमचे सदस्य यांना इतर पक्षाकडून आमिष दाखविण्यात आले आणि त्यांना तसे कळविण्यात आले. याचा अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांशी काही संबंध नाही. हे राजकारण खालच्या स्तरावरच्या नेत्यांनी घडवून आणले गेले होते. आपण महाविकास आघाडीत आहोत. दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक आणण्याविषयी निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तो नियम मोडत असाल, तर मग तो अधिकार आम्हाला देखील आहे”, असा इशारा राऊत यांनी दिला.