पुणे : ६ जून – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कलगीतुरा सुरूच आहे. ‘ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात’ असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पलटवार केला.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीत आणि शासनाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.
‘राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना वंदन करतो, महाराष्ट्राला शुभेच्छा देतो. रयतेचा काम कसं करावं हे छत्रपतीनी शिकवलं. घराघरांवर ,ग्रामपंचायती, कॉलेज ,सगळीकडे गुढी उभारून हा शिवस्वराज्य दिवस साजरा केला जातोय. रायगडावर सोहळा पाहून मोठा अभिमान वाटतो’, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
तसंच, ‘आम्ही मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजच्या दिवशी मराठा समाजाला मी अश्वस्त करतो इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहोत’ अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.
पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत अजित दादा म्हणाले की, ‘ जी गोष्ट झालेली आहे, तिला चौदा महिने झाले आहे. आता ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात’ असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.
ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती, त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे फार महत्व देत नाही. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन काही जण बोलत असतील तर फार महत्त्व द्यायची गरज नाही’, असं म्हणत अजित पवार यांनी विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांना टोला लगावला.
‘ग्रामविकास विभागाने आजचा दिवस शिवस्वराज्य दिवस सुरू करायचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने ही तसाच निर्णय घेतला आहे. कचरामुक्त पुणे जिल्हा अभियान सुरू आहे.१५६ कोटी या अभियानासाठी दिले आहे. खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पैसे मंजूर करून आणले आहे, अशीही माहितीही पवारांनी दिली.