नागपूर : ५ जून – पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून एक आरोपी एका बिल्डरच्या घरात घुसला. त्याने घरातील २ महिला आणि एका मुलीस ओलीस ठेवून ५0 लाखांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. दुपारी घडलेल्या या थरारनाट्याने शहरात खळबळ उडवून दिली. पण, हुडकेश्वर पोलिसांच्या कार्यकुशलतेमुळे मोठा अनर्थ घडण्यापासून वाचला. ही थरारक घटना शुक्रवारी हुडकेश्वर हद्दीतील पिपळा फाटा येथे दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, पिपळा येथील क्रिएटिव्ह कोऑपरेटिव्ह सोसायटी येथे बिल्डर राजू वैद्य यांचे घर आहे. शुक्रवारी (ता.४) दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास एक आरोपी बुरखा घालून त्यांच्या घरात शिरला. घरात त्यावेळी एक मुलगी आणि दोन महिलाच होत्या. आरोपीजवळ पिस्तूल आणि चाकू होता. त्याचा धाक दाखवून त्याने घरातील महिलांना ओलीस ठेवले. आरोपीने घराची दारे आणि खिडक्या आतून लावून घेतल्या. तसेच महिलांना ५0 लाख खंडणी दिल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही, असे बजाविले. पैसे जमविण्यासाठी त्याने महिलांना त्यांच्या नातेवाईकांना फोन करण्यास सांगितला. त्यानुसार वैद्य यांच्या मुलीने तिच्या काकाला फोन केला आणि आरोपींनी त्यांना ओलीस ठेवले असल्याचे सांगितले.
घाबरलेल्या मुलीच्या काकाने आरोपीला पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी लगेच या घटनेची पोलिसांना माहिती दिली. या घटनेची लवकरच शहरात चर्चा वायरल झाली. काही वेळेतच वैद्य यांच्या घरासमोर लोकांची तुफान गर्दी जमा झाली. हुडके श्वर पोलिसांनी इतरही पोलिस ठाण्यातून कुमक मागवून घेतली. गुन्हे शाखा पोलिस आणि शीघ्र कृती दलाचे जवानही घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला पैसे घेण्यासाठी बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने बाहेर न येता खिडकीतूनच पैसे देण्याचे सांगितले. पण, पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवत त्याला बाहेर काढले आणि त्याची चांगलीच खातीरदारी केली.
आरोपीला दोराने बांधून त्याला पोलिस वाहनात भरण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने लोक जमले होते. पोलिसांनी आरोपीला मेडिकलला नेण्याच्या बहाण्याने गुन्हे शाखेत नेले.