एकेकाळी भारत सरकारला कर्ज देणारे हे घराणे नागपुरातील
१९४२ साली या घराण्याने ४० लाख रु. आयकर भरला होता यावरून आपण त्याच्या गर्भश्रीमंतीचा अंदाज लावू शकतो. हे घराणे म्हणजे Knight commander of Indian Empire आणि दिवाण बहादूर सर ही इंग्रजांनी बहाल केलेली सन्मानाची पदवीचे पात्र असलेले ” कस्तुरचंद अबीरचंद डागा ” यांचे “डागा घराणे” होय
एकेकाळी डागा घराणे हे देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने Banker होते. ‘ रायबहादुर बन्सिलाल अबिरचंद’ या नावेने त्यांची कंपनी असून त्यांचा Banking व हुंडीचिठ्ठी चा देशासह देशाबाहेर मोठा उद्योगधंदा होता.या घराण्याचा ३०० वर्षांचा इतिहास नागपुरकरांची मान उंचावणारा आहे.दुर्दैवाने ३०० वर्षांचा कागदोपत्री इतिहास उपलब्ध नसला तरी १५० वर्ष जुन्या उपलब्ध इतिहासातुन या घराण्याचे वैभवसंपन्नता, दानशूरपणा आणि मह्त्वाचे म्हणजे दुरदृष्टीची पावलोपावली जाणीव होते. १५० वर्षांपूर्वी काळ आठवा ! त्याकाळी या घराण्याकडे ८० कोटी रुपयांची माया असून रंगून,पेशावर,ढाका, लाहोर रावलपिंडी सह देशभरात त्यांची इस्टेट पसरली होती. वेळप्रसंगी ते भारत सरकारला पैसे कर्जाऊ देत.
डागा घराणे हे मुळचे राजस्थान येथील बिकानेरचे ! धर्मदाय कार्यात या घराण्याला मोठा रस होता. त्यांच्या कडे गेलेला माणूस रित्या हाती कधी परतला नाही. त्यांच्या कार्यकाळात अनेक धर्मशाळा,मंदिरे उभारली गेली. बद्रीनाथ ह्या तिर्थस्थाळाच्या मुख्य मंदिराचा चांदीचा दरवाजा डागा घराण्यानेच दिलेला आहे. उज्जैन, जबलपूर येथे त्यांनी मंदिर बांधले आहे. बिकानेरच्या महाराजांकडे त्यांचा बराच दबदबा होता. भारताच्या व्हाइसरॉयला ते सरळ जाऊन भेटु शकत. १७९० च्या सुमारास हे घराणे बिकानेरहुन कामठीला आले. या काळात नागपुरपेक्षा कामठी हे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र होते. कामठी येथे या घराण्याने व्यवसाय केला आजही तेथे ‘रायबहादुर ओली’ या नावाने ओळ आहे. जगन्नाथ मंदिर आहे. तिथून मग ते नागपुरात आले. विदर्भात या घराण्याने आपली सृष्टी निर्माण केली १९४० च्या सुमारास विविध क्षेत्रात प्रवेश केला आणि मोठे यश संपादन केले तसेच १९७२ साली कोळसा खाणीचे राष्ट्रीयकरण झाले या निर्णयाचा मोठा फटका देखील त्यावेळी सहन करावा लागला. अनेक उतार चढावातही त्यानी जिद्दीने उद्योगक्षेत्रात झोकुन देत प्रगती केली त्यातूनच नागपुरची मॉडेल मिल , हिंगणघाट पुलगावची कॉटन मिल, कोळसा खाणी,तेल गिरण्या,जिनिंग मिल्स, इत्यादीचा यशस्वी डोलारा उभा केला. हे करत असतांना अनेक धर्मादाय कृत्य देखील घडत राहिले त्याची छाप आपल्याला नागपुरात प्रकर्षाने दिसून येइल.
नागपुर शहराच्या मध्यावर्ती भागात असलेलं “कस्तुरचंद पार्क” नागपुरातील पहिले महिला कॉलेज कस्तुरचंदजीच्या पत्नी अमृताबाई ह्यांच्या नावाने काढलेले ” L.A.D COLLAGE” किंवा मग गांधी बागेतील डागा हॉस्पिटल इत्यादी हे डागा घराण्याच्या मालकीचे होते हे कित्येकांना माहित होत ? नागपुर शहराच्या जडणघडणीत या घराण्याचे मोल बहुत आहेत हे विसरून चालणार नाही.
‘पुतळ्याचे शहर’ म्हणून नागपुर ही आपले वेगळी ओळख राखून आहे. क्वचितच कुठल्या महापुरुषाचा पुतळा नागपुरात नसेल. कस्तुरचंद पार्ककडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सेठ कस्तुरचंदजी डागा यांचा पांढरा शुभ्र संगमरवरी ( इटालियन मार्बल )दगडाचा अत्यंत रेखीव पुतळा उभा आहे. कस्तुरचंदजीच्या उजव्या हातात लखोटा असुन त्यांच्या बाजुला पुस्तके आहेत. त्यांनी धोतर परिधान केल असुन “लॉगकोट” गुडघ्याच्या खालपर्यंत (पायघोळ) आहे. गळ्यात मोत्याचा कंठा असुन झुबकेदार मिश्यामुळे चेहरा अधिक रुबाबदार वाटतो. जन्म १७ नोव्हेंबर १८५५ रोजी झाला तर २० जानेवारी १९१७ रोजी कस्तुरचंदजीचें वयाच्या अवघ्या ६२व्या वर्षी निधन झाले.
दिवंगत दीवान बहादूर सर कस्तूरचंद डागा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डिसेंबर १९२४ रोजी तत्कालीन राज्यपाल सर फ्रँक स्ली यांनी कस्तुरचंदजीच्यां पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध कलाकार सी के मत्रे यांनी या पुतळ्याचे डिझाइन व काम पूर्ण केले होते.
डागा घराण्याची एक जुनी परंपरा आहे नफ्यातील १० टक्के हिस्सा ते धर्मादाय कामात खर्च करतात. आजच्या पिढीनेही ही परंपरा अबाधित ठेवली आहे हे विशेष !! गर्भश्रीमंती असणे आणि श्रीमंती पचवणे वेगळे. ही श्रीमंती या घराण्याने पाचवली आहे, गरजवंताला वाटली आहे. हल्लीच्या झटापट श्रीमंतीच्या जमान्यात हे घराणे नागपुरचे वैभव आहे याचे रहस्य या गोष्टीत आहे. त्यांच्या उद्योजकतेचे व धर्मादायतेचे ठसे केवळ नागपुरातच नव्हे तर दुर्गम रावळपिंडीमध्येही दिसतात, जो त्यावेळी अविभाजित भारताचा भाग होता. सर कस्तूरचंद डागा यांनी रावळपिंडी (आता पाकिस्तानात) येथे एक प्रचंड जमीन दान केली होती आणि पाकिस्तानातही त्यांच्या नावावर एका उद्यानाचे नाव देण्यात आले होते.
भारताच्या उद्योगजगतात नवा आयाम देत, सर्वांगाने नावलौकिक कमावणारे, व्यापक विचारवंत, यशस्वी उद्योजक दिवंगत दीवान बहादूर सर कस्तूरचंद डागा यांचे योगदान आणि दुरदृष्टीचे पायामुळे नागपुरच्या मातीत रोवली गेली.
(माहिती संकलन व लेखन :- विशाल देवकर)