सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बुमरॅंग बाप्तिस्मा

इनुगु एअरपोर्ट पासून साधारण सव्वा तासाच्या अंतरावर “अमासिरी” हे गाव. “याम” पिकासाठी प्रसिद्ध. एक छोटेखानी गाव. वस्ती छोटीशी. इथले लोक आपल्या मस्तीत जगणारे. सकाळ पहाट होताच कामधंद्याला जाणारे, जास्तीतजास्त याम ची शेती आणि घरी पाम चे तेल काढणे, ह्या व्यवसायात गुंतलेले.
इनुगु एअरपोर्ट वरुन अमासिरी तासभराचा दुपदरी रस्ता, पण मस्त सगळीकडे गारे गार हिरवेगार, रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागलेले, मस्त जंगल मध्ये छोटी छोटी याम च्या शेतीचे तुकडे, मध्येच एखादे छोटेसे गाव म्हणता म्हणता सव्वा तास संपतो आणि अमासिरी ला पोचतो.
राहण्यासाठी घरं शोधायला गेलो तर मोठ मोठाले घरं, प्लॉट साईज खुप मोठे मोठे, घरामागे पाच खोल्यांचे सर्व्हंट क्वार्टर, त्यामागे थोडी मोकळी जागाच आणि त्याजागी एक दोन थडगे. मी परेशान. म्हणाले इथली ही प्रथा आहे. मेलेल्या व्यक्तीला आम्ही घरातच् पुरतो आणि संध्याकाळी रोज मेणबत्ती लावतो…….मला एकदम …..कही दीप जले कही दिल….. इतकं मोठे घरं आणि रात्री हे मेणबत्ती लावणार…….. आणि मी झोपेसाठी तडफडत राहणार….म्हटले नक्को असली घरं…….मजल दर मजल ……. एक घर मिळाले शेवटी…. चांगले ढेरमोठ्ठे आंगण समोर, पाच बेडरुम असलेले आठ खोल्यांचे घर. मागे सर्व्हंट क्वार्टर च्या पाच खोल्या. भली मोठ्ठी लिव्हिंग रुम, एक पायरी चढून डायनिंग हॉल आणि आतमध्ये मोठे स्वयंपाक घर, एक खोली गोडाऊन साठी, त्या खोलीला मी देवघर बनवले. एक बेडरूम माझ्यासाठी ठेवली आणि बाकी चार ही खोल्यांना कुलुप लावुन ठेवले.
समोर झोपडीच्या आकाराचा मोठा व्हरांडा. माझी कॉफी प्यायची सकाळची आवडती जागा. सकाळचे प्रातर्विधी आटोपले की व्हरांड्यात खुर्ची वर येवून बसले की कूक मस्तपैकी वाफाळलेली कॉफी बिस्किटे ठेवून जायचा. कॉफी पिता पिता अर्धा पाऊण तास भारतात आई, पोरांशी, बायकोशी बोलत बोलत २-३ कप कॉफी मजेत हळूहळू गटकायची, आळस झटकायचा आणि कात टाकल्यासारखे टवटवीत मनाने कामाला निघायचे हा आपला दिवसाचा शुभारंभ.
घराजवळ १०० मीटर वर दलदल, दलदल संपली की नदी, जवळपास २०० मीटर चे पात्र. ह्या नदीत मगरी असल्याने नदीचे पात्र का कुणास ठाऊक मला भीषण भासायचे.
एका रात्री प्रचंड पाऊस होता मी बाहेर व्हरांड्यात बसलो होतो, बाहेरचे लाईट अंगणातले सगळे लाईट सुरू होते आणि मी घरातील सगळे लाईट, दारे, पडदे बंद करून बाहेरचा व्हरांड्यात लाईट बंद करून बसलो होतो कारण बाहेर प्रचंड प्रमाणात पाकोळ्या आल्या होत्या आणि बाहेरच्या अंगणातील लाईट भोवती भिमभिरत होत्या आणि आमचे दोन्ही चौकिदार बाहेर ३-४ मोठे घमेले त्या लाईट खाली ठेवून भर पावसात घमेल्यात पाणी आणि पाण्यात पकडलेल्या पाकोळ्या. बस हा प्रोग्राम बघत उभा होतो. दोन्ही चौकीदार ओले होत, पाकोळ्या जमवण्यात मग्न. म्हटले काय करता रे? ते म्हणाले ह्या शिजवलेल्या पाकोळ्या भाताबरोबर खुप छान लागतात. आमची आता सात आठ दिवसांची निश्चिंती आहे, म्हणून दोघे ही खुष होते.
आमचा “सॉईल टेस्टिंग, सॉईल रेजिस्टंस टेस्ट” इबोनी स्टेट युनिव्हर्सिटी, इंजिनिअरिंग कॉलेज च्या चकरा सुरू होत्या. सर्वेक्षणाची सुरवातीची लागणारी माहिती गोळा करणे सुरू होते.
एक दिवस इंजिनिअरींग कॉलेज चा प्रोफेसर डॉ.पीटर घरी थडकला. ठेंगणा ठुसका डॉ. पीटर, डोक्याने तुळतुळीत,रंगाने काळा कुळकुळीत, बसकं नाक, त्याच्या दोन्ही बाजुला दोन डोळे, त्यातील एक डोळा तिरळा. मिशी, दाढी एकदम सफाचट साफ, नाईजेरियन रिवाजाप्रमाणे मोठे ओठ, खाली सुट बुट टाय कोट, महाशय चकाचक. म्हटले पीटर इकडे कसा काय आला , अचानक ते पण रविवारी? म्हणाला चर्च ला गेलो आणि सहज तुमच्याकडे आलो. आमचे कॉफी पान झाले बाहेर व्हरांड्यात. पीटर निघतो म्हणाला, आमचे बाहेर चे फाटक खालून खुप जास्त उघडे आहे, असे जाता जाता माहिती वजा तक्रार करून गेला. पीटर पठ्ठा तर गेला पण मला आज त्याचे घरी येणे मग तो चर्च च्या संलग्न बॉडीत मोठ्या हुद्द्यावर पदासीन आहे वगैरे वगैरे मला सांगण्याची गरज नव्हती. पण त्यादिवशी त्याचे घरी येणे काही बरे वाटले नाही.
पावसाळा जोरात होता आणि आमची कामं सुद्धा आटोक्यात होती.
एक दिवस रात्र भर प्रचंड पाऊस झाला, सकाळी आरामात उठलो. चौकीदार मंडळी पाऊस असल्याकारणाने मागे आपापल्या खोलीत निजलेली. सकाळी उठल्यावर शिरस्त्याप्रमाणे समोरचे दार उघडले आणि खुर्चीवर बसणार , समोर बघीतले तो एक मगर आवासुन माझ्यापासून २० फुटावर, आमच्या अंगणामध्ये फाटकाखालुन, माझे धाबे दणाणले, दणाणल्या धाब्यात पीटर आठवला. मी पटकन आत गेलो दार बंद केले, कुक ला सांगितले, चौकीदारांना घेवुन ये, पठ्ठा जायच्या आधी मगर बघितली आणि खुशी खुशी चौकीदारांना बोलवायला गेला. २-३ मिनिटांचे आत तिघेही जण दो-या आणि कोयते भाले घेवून आले आणि नंतर च्या पाच मिनिटांत निष्प्राण मगरीचे छोटे छोटे तुकडे कापून घमेल्यात गोळा करीत पावसाला धन्यवाद देत होते.
मध्यंतरी कॉलेजमध्ये डॉ. पीटरच्या भेटी झाल्या मात्र त्याचा कल टेस्ट रिपोर्ट देण्यापेक्षा , मी त्यांच्या चर्च ला भेट देऊन त्यांच्या बिशप ला एकदा भेटावे ह्याकडे जास्त होता.
एकदा डॉ. पीटर ने मला कॉलेजला बोलावले, इकडल्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग मला तो म्हणाला चल, आपण जवळच्या सेंट मेरी चर्च ला जावु. तुझी एक दोघांची भेट करून देतो. नाईलाजास्तव म्हटले चल पुष्कळ दिवसा पासून ह्याला खुमखुमी आहे. मी ख्रिश्चन नाही तर इतर धर्माचा आहे तर एकदा भेटुच सगळ्यांना.
मला बघताच सगळ्यांना आनंद झाला. अॅंडरसन, जोसेफ, अजून त्यांचे दोन पिलांटु, आमचा डॉ. पीटर आणि मी. असे सहा जण बसलो. ओळख पाळख झाली. आणि मग येशू ख्रिस्त कसा दिव्य पुत्र आहे आणि त्याने जगाला कसे मार्गदर्शन केले, तुम्ही सुद्धा ……. आता मी काहीच बोललो नाही तर पठ्ठे ऐकेचिना………
आता सगळे चर्च वाले शास्त्रार्थाच्या पावित्र्यात……मला पटवायला…..मी म्हटले सगळ्या युगपुरुषांनी आपापल्या धर्माची निर्मिती केली आहे. तुमचा येशू पण युगपुरुष आहे. आता त्यांना येशू चे गुणगान करण्याची संधी मिळाली आणि मी चर्च मध्ये पोचलो ही संधी त्यांना घालवायची नव्हती. शास्त्रार्थ करण्याच्या आविर्भावात त्यांनी आपला मुद्दा पुढे रेटला.
म्हणाले, येशू कुमारी मातेच्या उदरी जन्मलेला दिव्य पुरुष आहे… अरे, बापुडे हो. आमच्या भाषेत आम्ही अशा मुलांना “अनौरस” पोरगा म्हणतो. आता मी वैतागलो औकातीवर आलो.शास्त्र वगैरे तर आपल्याला समजत नाही पण स्वतः ला बचावणे तर निश्चितपणे येते.
त्यांनी बायबल काढले आणि खूप काही सांगाया लागले, ख्रिश्चन धर्म अस्सा…. ख्रिश्चन धर्म तस्सा…….. तुझं भलं…..आमचं भलं……. जगाचं भलं…… फक्त येशू… फक्त येशू.
म्हटले तुमची खरी संस्कृती परंपरा कोणती? ते म्हणाले “इबो – Igbo” म्हटले ह्या सुट बुटा पेक्षा तुम्ही स्वतः च्या इबो झगेवाल्या वेशभूषेत किती छान दिसता. तुमचे “याम फेस्टिवल” सुद्धा इबो पद्धतीने साजरा करता. तुम्ही लोकं थोड्याशा पैशांसाठी धर्म बदलला तर तुम्ही तुमच्या पुर्वजांशी प्रतारणा करत आहात असे नाही वाटत? तुमचे वडील आजी आजोबा स्वर्गातुन काय फुलं टाकतील तुमच्यावर? डेस्मंड टुटु ने छान भाष्य केले आहे,”When the missionaries came to Africa they had the Bible & we had a land. They said let’s pray. We closed our eyes. When we opened them we had the Bible & they had the land”. आणि असल्याप्रकाराला तुमच्यासारखे लोकं जबाबदार आहेत आणि आफ्रिकेची स्वतः ची संस्कृती, ओळख विसरून दुस-या धर्माचे गुणगान करताहात.
आमच्या धर्माने सगळ्यांना , आपापल्या धर्मानुसार वागण्याची अनुमती दिली आहे. मात्र कोणी हिंदू धर्मावर आक्रमण करणार असेल तर “धर्महिंसा तदैव च्” तर आमच्या धर्माने त्यांची हिंसा करण्याची शास्त्रानुसार अनुमती दिली आहे.हिंदु धर्म ह्याच कारणामुळे आजतागायत टिकून आहे.
आमची प्रार्थना फक्त एका धर्माचे भलं करण्याची नाही तर सर्व जग सुखी राहण्याची प्रार्थना केली आहे.
येशू ख्रिस्त ला मी दिव्य मानव, धर्म प्रस्थापक म्हणून मानतो पण लोकांना पैसे देऊन धर्मपरिवर्तन , हिंदू धर्मात अशा गोष्टींना मान्यताच् नाही. तुमच्या धर्माला शत शत नमन. पण तुम्ही रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र वाचा. त्यात त्यांनी ज्यावेळेस ख्रिश्चन धर्माचा, येशू ख्रिस्ताचा फोटो त्यांच्या दृष्टीस पडला. म्हणून त्यांनी “ख्रिश्चन धर्माचा” अभ्यास अवघ्या तीन दिवसांत केला. त्यांनी मुसलमान धर्माचा अभ्यास सुद्धा तीनच् दिवसांत केला आहे. फक्त शिष्यांना एकच् अट घातली होती की मी मुसलमान धर्माचा अभ्यास करताना गौ मांस भक्षणासाठी मागितले तरी कुठल्याही परिस्थितीत द्यायचे नाही.
हिंदू धर्म – इतर धर्मांच्या कितीतरी प्रगत आणि शास्त्रशुद्ध आहे. तर मी तुमचा धर्म स्विकारुन, माझी अधोगती का करावी?
मी तर म्हणतो तुम्ही एकदा धर्म बदलला आहे तर परत एकदा – तुम्ही सर्वांनी हिंदू धर्म स्विकारला तर काय हरकत आहे. तुमची अध्यात्मिक प्रगती पण होईल.
एक क्षण थांबलो… अंदाज घेतला……..माझ्या बोलण्याचा आवेग….सभा जेत्ता आवेशात… आणि दिलेल्या तर्कशुद्ध उदाहरणाने ते पाच ही नि: शब्द. …… भागने का सही मौका……..बोला मन मे…..भाग भाई आंधी गई…. सगळ्यांना सांगितले मी निघतो, कृपया विचार करा हिंदू धर्मात येण्याविषयी, असे बोलून सटकलो….

भाई देवघरे

Leave a Reply