मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा – विनायक मेटे

बीड : ५ जून – मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे ठाकरे सरकारने कधीच जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. याचा परिणाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. मात्र, आता मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आम्ही तुम्हाला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. ते बीडमध्ये बोलत होते. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 5 जून) निघालेल्या या मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी मंचावर भाजपा नेते नरेंद्र पाटील यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची उपस्थिती होती. दरम्यान, बीड शहरातील चौकाचौकांत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील अकराही तालुक्यामधून मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार मेटे म्हणाले, मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आज आरक्षणाची आवश्यकता आहे. अनेक मराठा समाजाची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. नोकरीमध्ये संधी मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीतून समाज जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आवश्यक आहे. यासाठी वारंवार मोर्चे, आंदोलने केलेली आहेत. तरीही आम्हाला आरक्षण मिळालेले नाही. मात्र, आता समाज शांत बसणार नाही. पाच जुलैपर्यंत जर राज्य शासनाने मराठा आरक्षण मागणी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. तर सात जुलै दरम्यान होणारे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी मेटे यांनी दिला आहे. आम्ही आमचे आंदोलन अजून तीव्र करू, आज बीडमधून आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाज एकत्र येत ठाकरे सरकार विरोधात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
माझे वडील म्हणजेच अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वात पहिल्यांदा आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळीही काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यांनी सुरू केलेली ही मराठा आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे भाजप नेते नरेंद्र पाटील म्हणाले.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे येथून मोर्चाला सुरुवात झाली. दरम्यान, मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथून सुभाष रोड, साठे चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.

Leave a Reply