भारत बायोटेकच्या लहान मुलांच्या कोव्हॅक्सिनची चाचणी नागपुरातही होणार

नागपूर : ५ जून – कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना ओसरते तोपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराही समावेश आहे. आज नागपूर शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली आहे.
नागपूर शहरातील मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये आज 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. हेल्दी सॅम्पल टेस्टिंगसाठी आज 50 मुलांची स्क्रिनिंग घेण्यात आली आहे. याचे रिपोर्ट आल्यावर वॅक्सिनच्या ट्रालयला सुरुवात होणार आहे. एकूण तीन टप्प्यांत हे ट्रायल होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी होईल, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी होईल आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होणार आहे.
या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होणार असून त्यानंतर मुलांवर क्लिनिकल ट्रायल होणार आहे. नागपुरात क्लिनिकल ट्रायल बालरोगतज्ञ डॉ वसंत खळतकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. यामध्ये सुरुवातीला स्टडी सॅम्पल घेण्यात येथील, ज्या मुलांवर परिणाम चांगले असतील त्यांना 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे.
देशातील चार ठिकाणी 208 दिवस हे ट्रायल चालणार आहे. एकूण 525 मुलांचे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्याची तीन वयोगटात विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजेच 2 ते 6 वर्षे वयोगटातील 175 मुलांना, 6 ते 12 वर्ष वयोगटातील 175 आणि 12 ते 18 वर्ष वयोगटातील 175 मुलांवर ही क्लिनिकल ट्रायल पार पडणार आहे.
लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली असून याचे रिपोर्ट सकारात्मक आल्यावर लवकरच लहान मुलांसाठी कोविड लस उपलब्ध होईल. लहान मुलांसाठी कोविड लस उपलब्ध झाल्यास त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल आणि संसर्ग पसरण्याची शक्यताही कमी होईल.

Leave a Reply