निरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे पंतप्रधानांशी चांगले संबंध – हसन मुश्रीफ यांचा आरोप

कोल्हापूर : ५ जून – बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.
चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे.
चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी चोक्सीची 14 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली होती. त्याशिवाय मोदीला युनायटेड किंगडम (UK) कोर्टाकडून मोठा धक्का बसला. कोर्टाने मोदीला कोणतीही सवलत देण्यापासून नकार दिला. मोदीला दोषी ठरवण्यासाठी आवश्यक पुरावे असल्याचंही वेस्टमिन्स्टर कोर्टानं स्पष्ट केले होते. त्याने पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचला होता. चोक्सी जानेवारी 2018मध्ये भारतातून पसार झाला होता. त्यानंतर 2017मध्ये कॅरेबियन बेटावरील अँटिगा आणि बारबुडा या देशाचे त्याने नागरिकत्व घेतलं. आपला भाचा नीरव मोदीसोबत त्याने पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी लंपास केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नीरव लंडनच्या एका तुरुंगा शिक्षा भोगत आहे.

Leave a Reply