धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यभर आंदोलन – डॉ. विकास महात्मेचा इशारा

नागपूर : ५ जून – ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आता धनगर आरक्षणावरून भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी दंड थोपटले आहेत. राज्य सरकारने धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास महात्मे यांनी दिला आहे.
खासदार विकास महात्मे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना धनगर आरक्षणासह विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या चक्रव्युहात अडकलं आहे. मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी सरकारला इशारे देण्यात आले आहेत. धनगर आरक्षणासाठी तर या सरकारने काहीच केलं नाही, असा आरोप महात्मे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले होते. महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम धनगर समाजाला द्यावी, अशी मागणी करतानाच धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply