जागतिक पर्यावरण दिन ( ५ जून )

संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या पर्यावरण विषयक परिषदेमध्ये जागतिक पर्यावरणावर सखोल चर्चा झाली. त्यावेळेस पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे तो सुस्थितीत राखण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याची गरज आहे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.तसेच याच परिषदेत यासंबंधी एक निर्णय घेऊन दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जावा असे ठरले. त्यानुसार पुढील वर्षापासून म्हणजे दि.५ जून १९७३ पासून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. जवळपास जगातील १००च्या वर देशात पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.यानिमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम जसे वृक्षलागवड,वृक्षदिंडी, परिसंवाद,याच विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
साधारणतः औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतरच पर्यावरणाचा समतोल ढासळायला सुरुवात झाली असे दिसून येते.या क्रांतीनंतरच मोठे मोठे औद्योगिक कारखाने सुरू झाले.त्यामुळे कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू,धुर वातावरणात मिसळायला लागला.कारखान्यांमधून निघणारे खराब पाणी नदी, नाल्यात, तलावात सोडल्या जाऊ लागले.तसेच नागरिकांना जाणे येण्यासाठी सार्वजनिक वाहनांच्या कमतरतेमुळे किंवा योग्य सुविधा उपलब्ध न झाल्याने प्रत्येकाला इच्छा नसतांनाही स्वत:चे खाजगी वाहनाचा वापर करणे गरजेचे झाले.त्यामुळेही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.पशु,पक्षी यांच्या संख्येत पण लक्षणीय घट झाली.
पर्यावरण हा शब्दाला व्यापक अर्थ आहे.निसर्गाने सहज मोफत उपलब्ध करून दिलेले जल, वायू,पर्वत,झाडं तसेच इतर नैसर्गिक घटकांचे मानवाने आपल्या स्वार्थासाठी,स्वत:च्या उपयोगासाठी वाटेल तसा उपयोग करून घेतला.त्याचे विपरीत परिणाम आज वर्तमानकाळात आपल्याला भोगावे लागत आहे.थोडक्यात काय मनुष्यानेच पर्यावरणाला विकृत बनवले आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.परंतू दुदैवाने आजही आपण पाहिजे त्या प्रमाणात जागरूक झालो नाही.स्वत:मध्ये त्या अनुषंगाने बदल करायची मानसिकता नाही.
चांगले पर्यावरण राखणे हे फक्त सरकारची, कारखान दारांची,उद्योगपतींची जबाबदारी आहे असे म्हणून सर्वसामान्य माणूस आपले कर्तव्य विसरतो आहे. नागरिक मात्र सरकारवर आणि इतरांवर दोष देण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवतात. पर्यावरणाच्या वर्तमान हलाखीच्या परिस्थितीत जर सुधारणा घडवून आणायची असेल तर त्यासाठी सामान्य माणसाच्या मदतीची,सहकार्याची फार आवश्यकता आहे.जोपर्यंत सामान्य माणूस हा पर्यावरण संरक्षण ही माझी जवाबदारी आहे याची सुरुवात मी माझ्या पासून करील,तसेच हे स्वत:च्या मनावर बिंबवत नाही तोपर्यंत सरकारने कितीही योजना आणल्या, उद्योगपतींनी सुध्दा कितीही सुधारणा केल्या तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल,त्याचा समतोल राखण्यासाठी सरकार, कारखानदार, उद्योगपती सर्व राजकीय पक्ष, समाजसेवक, समाजसुधारक,समाजातील बुध्दिजीवी आणि नागरिक यांनी एकत्र येऊन,हातात हात घालून जर यासाठी सकारात्मक प्रयत्न केले तर निश्चितपणे याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. अनुभवायास मिळतील.
यंदाच्या ५ जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण संकल्प करू या.
आपल्याला आणि आपल्या परिवाराला पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • रवींद्र गोविंद पांडे
    केंद्रीय सहसचिव ग्रंथालय भारती

Leave a Reply