काँग्रेसचे उद्यापासून मिशन विदर्भ, नाना पटोले संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार

नागपूर : ५ जून – भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात आता काँग्रेस कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसचं उद्यापासून मिशन विदर्भ सुरु होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून संपूर्ण विदर्भाचा दौरा सुरु करणार आहेत. विदर्भात संघटना मजबूत करण्यावर आता काँग्रेसचा भर असणार आहे. नाना पटोले रविवारी गोंदियामधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची यावेळी घरवापसी होणार असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.
विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजपचा हा गड भेदण्यासाठी काँग्रेसचं मिशन विदर्भ सुरु झालंय. पक्ष मजबूत करणे, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत आणणे, कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम देणे, यासाठी नाना पटोले उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देणार आहे. नाना पटोले उद्या गोंदिया जिल्ह्यापासून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, तशी माहिती त्यांनी दिलीय.
उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करा असे, असे आवाहन पटोले यांनी गुरुवारी केलंय. काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून, काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply