अंधश्रद्धा आणि गैरसमज बाजूला ठेऊन कोरोनाची लस घ्या – विजय वडेट्टीवार

गडचिरोली : ५ जून – गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज आहेत, ते न बाळगता सर्वांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले मी कालच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला, मी आज तुमच्यासमोर आलो आहे. मला काहीही झाले नाही. सर्वांनी कोरोना लस घेतल्यास भविष्यात आपणाला मास्क घालायची गरजही नसेल. राज्यात शासनाने केलेल्या प्रयत्नामुळे आपणाला राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळविता आले आहे.
राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असा गाफील राहता कामा नये. राज्यात हळुहळु अनलॉकची करण्यात येत असल्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनानी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशाचे पालन केल्यास निश्चितच कोरोना राज्यातून हद्दपार करता येईल. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता/शंका वर्तविण्यात येत आहे. त्यापासून आपणाला वाचायचे असेल तर सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खुप कमी होऊन जातो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी काळजी न करता, अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्या व आपला जीव वाचवा असे आवाहन त्यांनी सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणावेळी केले. ते गडचिरोली येथे नवेगाव ग्रामपंचायती अंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, उपाध्यक्ष जिल्हा परिषद मनोहर पोरेटी पाटील, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ.मडावी उपस्थित होते.

Leave a Reply