विना डिग्रीच्या डॉक्टरवर कारवाई करावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : २ जून – विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध झालेल्या उपचार पद्धतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय नेत्यांसह इतर मान्यवरांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही आता रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे. ‘विना डिग्रीचा कोणी डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबांना हाणला आहे.
‘ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही, तो लोकांना उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात, मात्र, आपले दुकान व व्यवसाय चालवण्यासाठी ते वक्तव्य करत असतील तर हे चुकीचं आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

‘केंद्रीय आरोग्य विभागानं रामदेवबाबांची विधानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. देशात अॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनली आहे. ‘रामदेवबाबा हे डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री त्यांनी घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरून ते सतत काहीतरी विधानं करत आहेत. अॅलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरून उपचाराचे सल्ले देत आहेत. हे चुकीचं आहे,’ असं मलिक म्हणाले.
‘देशाच्या संविधानानुसार वैज्ञानिक पद्धतीनं संपूर्ण देशाचं कामकाज चालायला हवं. अंधश्रद्धेचा प्रचार कोण करत असेल तर ते देशासाठी घातक आहे. रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात, त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही,’ अशी नाराजीही मलिक यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply