भारतीय दुग्धाक्षेत्राची प्रतिमा डागाळणाऱ्या पेटावर बंदी घाला – अमूलची मागणी

नवी दिल्ली : २ जून – देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी ‘अमूल’ आणि प्राण्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लढणाऱ्या ‘पेटा’ या दोन संस्थांमध्ये ‘वेगन मिल्क’वरून सुरू झालेला वाद चिघळलाय. अमूलचे उपाध्यक्ष वालमजी हुंबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे त्यांनी ‘भारतीय दुग्धक्षेत्राची प्रतिमा डागाळत जवळपास १० कोटी नागरिकांचं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पेटावर बंदी’ घालण्याची मागणी केलीय.
गाईच्या दुधाऐवजी वेगन मिल्क उत्पादनाकडे वळावं, असा सल्ला ‘पेटा’ कडून ‘अमूल’ला एका पत्राद्वारे देण्यात आला होता. यावर ‘प्लान्ट बेस्ड डेअरी’ उत्पादनांकडे वळल्यानंतर देशातील कोट्यवधी नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास कशी मदत मिळणार? असा सवाल ‘अमूल’कडून उपस्थित करण्यात आला होता. सोबतच, पेटावर निशाणा साधत ‘परदेशी फंडाद्वारे चालवण्यात येणाऱ्या एनजीओनं भारतीय डेअरी उद्योग नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये’ अशी तिखट प्रतिक्रियाही अमूलनं दिली होती.

‘भारताच्या जीडीपीमध्ये दुग्ध क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. परंतु पेटासारख्या स्वयंसेवी संस्थांच्या संधीसाधू घटकांनी फैलावलेल्या चुकीच्या माहितीमुळे जीडीपीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतीय दूध उत्पादकांना बेरोजगार बनवण्याचा कट अशा संस्थांकडून रचला जात आहे’ असा आरोप अमूलच्या उपाध्यक्षांनी आपल्या पत्रात केला आहे.

वेगन दूध तयार करण्याविषयीचा पेटाचा सल्ला हा भारतातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना संपवण्याच्या आणि देशातील रोजगार नष्ट करण्याच्या कटाचा एक भाग आहे, असा आरोप अमूलकडून करण्यात आलाय.

‘भारतात अशा संस्थांना वेळीच आळा घालण्यासाठी गुजरातेच्या दूध उत्पादकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहे की, दुग्ध उद्योगाच्या प्रतिमेला कलंकित करणाऱ्या अशा पद्धतीच्या मोहिमा राबवणाऱ्या संस्थांवर बंदी घालावी’ असंही या पत्रात म्हटलं गेलंय. कृत्रिम दूध तयार करणार्या मल्टीनेशनल कंपन्यांच्या संयंत्रांना प्रोत्साहन देण्याचा या संस्थांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही ‘पेटा’वर करण्यात आलाय.

Leave a Reply