देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील – संजय राऊत

मुंबई : २ जून – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट देण्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील असं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी फडणवीसांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं आहे.
“राजकारणात कोणी शत्रू नसतो, ते मित्र आहेत आणि राहतील. काल ते खडसेंच्या घरी गेल्याचं पाहून मला चांगलं वाटलं. त्याआधी ते शरद पवारांच्या घरी गेले. विरोधी पक्ष जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण लोकशाहीत संवाद असलाय हवा, महाराष्ट्रात ही परंपरा आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घऱी गेले असतील तर स्वागत करायचा पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. एकमेकांकडे जात राहिलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर बोलताना, तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात अशी टीका त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी उद्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी मोदींना पत्र लिहितील असं म्हटलं होतं.
“देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं. लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.
“फडणवीसांचं दु:ख समजून घेतलं पाहिजे. माझ्यामुळे सत्ता गेल्याची वेदना आहे. मी त्यांचं दु:ख समजतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“निवडणुका होतील तेव्हा एकमेकाशी लढत राहू, संघर्ष करु. लोक कौल देतील तो स्वीकारु. पण मग आता कशासाठी वाद निर्माण करत आहात?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी घाई करु नये असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता?”.

Leave a Reply