गडचिरोली : २ जून – सुरक्षा दलाकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कोंडागाव जिल्ह्यात धनोरा क्षेत्रातील डोंगरी भागात ही कारवाई करण्यात आली असून ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच घटनास्थळाहून १ एस.एल.आर, १ रायफल आणि ३ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.
उत्तर बस्तर भागात ३१ मे रोजी रमेश टेकाम याच्यासह इतर १० ते १२ नक्षलवाद्दी उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर कोंडागाव जिल्हा मुख्यालयातून एक टीम या माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली. त्यानंतर आज म्हणजे १ जून रोजी १२.३० वाजता पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आलं आहे.
दोन जणांना ठार करण्यात यश आलं असलं तरीही आसपासच्या परिसरात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची सुरक्षा दलांना शंका आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
घटनास्थळी घातक शस्त्रांसह बॅनर, पोस्टर, टेंट साहित्य, भांडी आणि इतर दैनंदिन उपयोगातील साहित्यही आढळून आलं.
‘चकमकीत आणखीही काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज असून सातत्याने इतर माओवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे,’ अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली आहे.