सहा महिन्याच्या मुलाला अमानुषपणे मारणाऱ्या आईविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र अटक केली नाही

नागपूर : १ जून – सासू-सूनेच्या भांडणात एक निर्दयी आई तिच्या सहा महिन्यांच्या मुलाला अमानुषपणे मारत असल्याचा व्हिडीओ काल सोमवारी वायरल झाला. त्याची दखल घेत त्या आईवर अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, बाळ खूप लहान असल्याने मुलाच्या आईला तंबी देऊन तसेच तिचे समुपदेशन करून तिला सोडण्यात आले आहे.
सासू-सुनेचे भांडण सुरू असताना एक आई तिच्या सहा महिन्यांच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला. यात एक महिला तिच्या मुलाच्या गालावर, पाठीवर आणि इतर ठिकाणी त्याला चापट्या मारताना दिसत होती. तसेच ती त्या मुलाला गादीवर उचलून फेकतही होती. मुलाला यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते, याचे जराही भान महिलेला नव्हते. या व्हिडीओ एका सदगृहस्थाने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना ट्विट केला. तसेच काही वेळेतच हा व्हिडीओ वायरल झाला. घटनेचे गांभीर्य पाहता, परिमंडळ क्र. २ च्या पोलिस उपायुक्त यांनी अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले. हिवरे यांनी लगेच पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना तसेच डी.बी. पथकाला वायरल व्हिडीओची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २४ मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पांढराबोडी येथे राहणार्या महिलेने हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने लगेच महिलेच्या तावडीतून बाळाची सुटका करीत बाळ सुखरूप असल्याची खात्री करून घेतली.

Leave a Reply