मुंबई : १ जून – महाविकास आघाडी सरकार उठसूठ केंद्र सरकारकडे बोट दाखवते व आपले अपयश झाकून ठेवते, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना राज्यात इंधनाचे दर स्थिर होते. गुजरात व कर्नाटक राज्यात तेथील सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने तेथे इंधन स्वस्त आहे. राज्यानेही इंधनावरील कर कमी करून भार उचलावा असे दरेकर यांनी सरकारवर टीका करताना सांगितले.
पालघर जिल्ह्यात २०० कोटींचे नुकसान झालेले असताना प्रशासनाने नुकसान कमी दाखवले आहे. नुकसानीचे पंचनामे विसंगत आहेत, असे दरेकर यांनी आरोप केले.
शॉटसर्किटमुळे पालघर तालुक्यातील गिरणोली येथील पाटील कुटुंबियांचे घर जळून खाक झाले होते. या घराला दरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. घराचे नुकसान शॉर्ट सर्किटने झाल्याने ती नुकसानभरपाई महावितरण देणार असल्याचे तालुका प्रशासनामार्फत सांगण्यात आले असले, तरी हे पंचनामे फक्त नावापूरतेच असून एकमेकांवर खापर फोडून हे प्रशासन हात वर करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले. त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तत्काळ पाटील कुटुंबियांना मदत द्यावी, अशी विनंती केली व महावितरण अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबियांना २५ हजारांचा धनादेश व जीवनावश्यक वस्तू मदत स्वरूपात दिल्या. दरेकर यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.