यवतमाळ : १ जून – यवतमाळ येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका बापाने मुलीवर आणि जावयावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
‘प्रेम म्हणजे प्रेम असते,तुमचं आमचं सेम असते’, मात्र ही संकल्पना समाजातील सर्वच घटकाला लागू पडेल असे नाही. प्रेमाचा आनाभाता घेत तरुण आणि तरुणी हे दोघे घरच्या नातेवाईकांच्या इच्छेविरोधात जाऊन साता जन्माच्या गाठी बांधत पाच वर्षा आधी पसार झाले होते. मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांचा काही थांगपत्ता लागला नाही.
तेव्हा पासून प्रचंड संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी सोमवारी रात्री उशिरा स्वतःच्या मुलीवर आणि जावायावर चाकुने सपासप वार करुन दोघांनाही गंभीर जखमी केल्याची घटना आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिकणी (क) येथे घडली.
या घटनेत शुभांगी सागर अंभोरे आणि सागर काशीनाथ अंभोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी आणि जखमी असलेल्या मुलीचे वडील दादाराव सिताराम माटाळकर यांनी मुलगी शुभांगी आणि जावई यांच्या घरी जावून त्यांच्यावर चाकुने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला.
2016 मध्ये शुभांगी आणि सागर अंभोरे हे दोघेही पळून गेले होते. त्यानंतर दोघांनी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे आरोपी दादाराव सिताराम माटाळकर यांना आपली समाजात बदनामी होत असल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातूनच दादाराव सिताराम माटाळकर यांनी मुलगी आणि जावायाच्या घरात जावून मुलीच्या पोटावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर जावाई सागर अंभोरे यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर हल्ला करुन दोघाला गंभीर जखमी केले.
दरम्यान, या घटनेची तक्रार सागरचे काका नारायण अंभोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री अकरा वाजता दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी दादाराव माटाळकर यांच्या विरोधात जीवानीशी मारण्याच्या उद्देशाने आणि जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.