देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी, पुन्हा चर्चा

जळगाव : १ जून – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी गिरीश महाजनदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.
एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडत असल्याचा आरोप केला होता. भाजपा सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान फडणवीस यांनीदेखील खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही फडणवीस यांनी खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply