मंत्रालयात बॉम्ब असल्याचा खोटा फोन करणाऱ्या सागर मंदरेने सांगितली आपबिती

नागपूर : ३१ मे – महसूल खात्याने माझी २० आर शेतजमीन अधिग्रहीत केली आणि ती वेकोलिला देऊन टाकली. पण माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे काय? त्यांना तर त्या जमिनीचा मोबदला सुमारे २० वर्षांपासून मिळालेलाच नाही. म्हणून मी महसूल विभागाला त्या जमिनीचा ७/१२ मागितला. तो मिळत नसल्यानेच सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. मात्र प्रशासन आपली चूक झाकत मला दोषी ठरवित आहे. लोकशाही व्यवस्थेत न्यायासाठी लढा देणे गुन्हा आहे का? असा प्रश्न सागर काशीनाथ मंदरे या दिव्यांग व्यक्तीने उपस्थित केला आहे. रविवार ३० मे २०२१ रोजी मुंबई मंत्रालयात बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. हा फोन सागर यानेच केला होता.
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील रहिवासी सागर मंदरे याच्याकडे २.६३ आर शेतजमीन होती. त्यातील २.६३ आर शेतजमीन त्यांच्या वडिलांनी विकली. उर्वरित २० आर शेतजमीन महसूल खात्याने सुमारे २० वर्षांपूर्वी अधिग्रहीत केली. त्यानंतर ती जमीन वेकोलिला देऊन टाकली. मात्र त्याचा मोबदला अद्यापही मंदरे कुटुंबीयांना देण्यात आलेला नाही. आता मोबदला देत नसल्याने सागरच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. सुमारे ६३ टक्के दिव्यांग असलेले सागर मंदरे, आई-वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह मकरधोकडा गावात राहतात. फिटर विषयात आयटीआय करूनही सागरला अद्याप नोकरी लागलेली आहे. परिणामी त्याची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे.
यामुळे व्यथित झालेल्या सागरने सातत्याने मंत्रालयात चकरा मारल्या. महसूल विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतलीच नाही. अखेर नाईलाजाने त्यांनी लोकशाहीतील ब्रह्मास्त्र फेकले आणि आत्मदहनासह मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याचाही इशारा दिला. यामुळे कापसाचे बोळे कानात टाकलेली व्यवस्थाही जागी झाली व त्यांनी सागर मंदरे यांचा पटकन शोध लावला. उमरेड पोलिसांनी क्षणाचीही उसंत न घेता सागर यांना ताब्यात घेतले. दरम्यान सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यांचे बयाणही नोंदवले आणि काही वेळानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनाने घरी परत आणून सोडले.
आमच्याशी चर्चा न करता महसूल खात्याने २० आर शेतजमीन घेतली. वस्तुत: त्यावर आमच्या कुटुंबीयांची गुजराण सुरू होती. महसूलकडे न्याय मागितला, पण त्यांनी काहीच केले. अखेर आत्मदहनाचा इशारा दिला तेव्हा ते जागे झाले. साहेब, मला आमच्या जमिनीचा सात बारा महसूलने द्यावा एवढीच विनंती असल्याची भूमिका सागर काशीनाथ मंदरे यांनी मांडली.

Leave a Reply