वॉशिंग्टन : ३१ मे – संपूर्ण जगाचं लक्ष सध्या मंगळावरील संशोधनावर लागलं आहे. अमेरिकेने आपली महत्त्वकांक्षी योजना राबवत मंगळावर जीवसृष्टीसाठी पुरक वातावरण आहे का याचा शोध सुरु केलाय. याचाच भाग म्हणून नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जात आहेत. आता याच रोव्हरने मंगळ ग्रहावर घेतलेले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो म्हणजे मंगळ ग्रहावरील ढगांचे फोटो आहेत. पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहाच्या अवकाशातही ढग जमा झाल्याचं पाहून अनेकांना सुखद धक्का बसलाय.
नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरने हे फोटो शेअर केल्यानंतर आत जगभरात हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. विशेष म्हणजे क्युरॉसिटी रोव्हरच्या फोटोंची जीआयएफ फाईन पाहिल्यास त्यात ढगांची हालचालही पाहता येते आहे. मंगळावर ढग असल्यानं तिथं जीवसृष्टीसाठी पुरक वातावरणही असण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहेत. अनेक लोक मंगळ ग्रहाला दुसी पृथ्वीच म्हणत आहेत.
मंगळावरील सामान्यपणे वातावरण कोरडं आणि निरभ्र असतं. खूप तुरळक वेळीच हे ढग दिसतात. हाच दुर्मिळ क्षण क्युरॉसिटी रोव्हरने आपल्या कॅमेरात टिपलाय. मंगळावर तेथील वर्षाच्या सर्वात थंड दिवसांमध्येच ढग दिसतात. अंडाकृती मंगळ ग्रहाचं केंद्र जेव्हा सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असतो तेव्हा हे थंडीचे दिवस येतात. मंगळावर शास्त्रज्ञांना खूप लवकर हे ढग दिसले आहेत. मंगळावरील एक वर्ष म्हणजेच पृथ्वीवरील 2 वर्षे इतक्या लवकर हे ढग दिसले.
क्युरॉसिटी रोव्हरच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मंगळावरील ढगांचे हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “कधी कधी तुम्हाला केवळ थांबायचं असतं आणि मंगळावरील हे ढग पाहायचे असतात. मंगळावर ढग पाहायला मिळणं दुर्मिळ असतं. कारण येथील वातावरण शुष्क आणि कोरडं आहे. मात्र, मी माझ्या कॅमेरातून टिपलेले काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करु इच्छितो.”