नागपूर : ३१ मे – मानकापूर हद्दीत एकतानगर येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्र.२ च्या पथकाने छापा टाकून रंगेहात पकडले. आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट क्र.२ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, मानकापूर हद्दीत एकता नगर प्लॉट क्र.११, शिवमंदिर येथे नीलेश कडबे नावाचा इसम आणि त्याचे साथीदार भारतीय चलनाच्या बनावट नोटा तयार करीत आहेत. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्र.२ च्या पथकाने २९ मे ला रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास तेथे छापा टाकला. त्यावेळी पोलिस पथकाने नीलेश राजू कडबे (२४) रा. समता नगर, लंका कॉलनी आणि मारूफ खान वल्द रफिक खान (२४) राजनगर टेका , पंचशील नगर रोड हे बनावट चलनी नोटा तयार करताना मिळून आले. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याकरिता वापरण्यात येत असलेला ईपसॉन कंपनीचा काळ्या रंगाचा मोठा प्रिंटर, वेगवेगळ्या शाईचे डब्बे, बॉटल, कटर, मोजमाप पट्टी, मार्कर पेन, चिकट टेप आणि ईतर साहित्य मिळून आले. आरोपींना बनवट नोटांबद्दल विचारणा केली असता, प्रिंटरच्या सहाय्याने बनावट नोटा तयार करीत असल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.