दुचाकी चोरट्यांजवळून केल्या १४ दुचाकी जप्त

अकोला : ३१ मे – स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीचा तपास करीत असताना दोघांना अटक केली. या दुचाकी चोरट्यांजवळून १४ दुचाकी जप्त केल्या असून रामदासपेठ व शहर कोतवाली पोलिस ठाण्याअंतर्गत ९ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. पुढील गुन्ह्यांच्या तपासासाठी आरोपी शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. शहरातील खोलेश्वर परिसरात राहणार्या नीलेश धायडे यांची मोटार सायकल ९ मे रोजी महापालिकेच्या लगत असणार्या दुकानाजवळून चोरी गेली. याबाबतची तक्रार त्यांनी शहर कोतवाली पोलिस ठाण्यात १२ मे रोजी केली. याप्रकरणाचा तपास करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला गांधी चौक परिसरात दोन जण संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
या दोघांची चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र, नंतर 13 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. या दोन्ही आरोपींकडून एकूण 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. शहर कोतवाली परिसरातील वाहन चोरीचे 8 तर रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत 1 अशा 9 गुन्ह्यांची कबुली आरोपी शेख नसीफ शे. गफूर आणि सै. फय्यूम सै. कय्यूम याने दिली. हे दोनही आरोपी अकोट फैल परिसरातील रहिवासी आहेत. मोटार सायकल चोरीचे सराईत असलेल्या या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पुढील तपासाकरिता आरोपी शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैेलेश सपकाळ, पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, नापोकॉ संदीप काटकर, विशाल मोरे, शंकर डाबेराव, लिलाधर खंडारे, रवि पालीवाल, अनिल राठोड, प्रवीण कश्यप, सतीश गुप्ता, रोशन पटले, सुशील खंडारे यांनी केली.

Leave a Reply