नवी दिल्ली : ३१ मे – लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणितं बांधली जात असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं अर्थतज्ज्ञांकडून सुचवलं जातं. चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते.”टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणाला आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.
गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचं एका अहवालातून समोर आलं. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. नव्या पॉलिसीला चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चीनमधील टू चाइल्ड पॉलिसी संपुष्टात आली आहे.
चीनमध्ये २०१० ते २०२० या कालावतील लोकसंख्या वाढीचा वेग हा ०.५३ टक्के इतका होता. मागच्या दोन दशकात चीनमधील लोकसंख्येत कमालीची घट झाली आहे. २०२० या वर्षात फक्त १२ दशलक्ष मुलांचा जन्म झाला. २०१८ मध्ये १८ दशलक्ष मुलांचा जन्म झाला होता. मात्र असं असलं तरी जागतिक लोकसंख्या यादीत आताही चीन आघाडीवर आहे. त्या खालोखाल भारत आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. वर्ल्डोमीटर या वेबासाईटवर ही माहिती देण्यात आली आहे.