नागपूर : ३१ मे – भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी जनगणनेचे आकडे जाहीर करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या अतिरिक्त आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोग तयार करण्यात आदेश दिले होते. मात्र, 15 महिन्यांच्या काळात ठाकरे सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मुदतवाढ देण्यास नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
ठाकरे सरकारच न्यायालयात ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची कबुली देऊन बसले. तसेच त्यांनी घटनापीठाने दिलेल्या आदेशाच्यादृष्टीनेही कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी आमच्या काळात अध्यादेश काढून मिळवलेले ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले. आता राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या तर किमान 50 टक्क्यांच्या आतमधील आरक्षण तरी वाचवता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.