अर्थमंत्रालयातील लोकांचा बुद्धिगुणांक कमी असतो – सुब्रमण्यम स्वामींची टीका

नवी दिल्ली : ३१ मे – आपल्या चर्चेत राहणाऱ्या वक्तव्यांमुळे सतत बातम्यांमध्ये सोशल मीडियावर झळकणारे भाजपाचे खासदार म्हणजे डॉ. सुब्रमण्यम स्वामी. सुब्रमण्यम हे राज्यसभेमध्ये भाजपा खासदार असले तरी ते अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. अशाच पद्धतीची टीका पुन्हा एकदा स्वामी यांनी अर्थमंत्रालयासंदर्भात बोलताना केली आहे. अर्थमंत्रालयातील लोकांचा आयक्यू म्हणजेच बुद्धिगुणांक कमी असतो अशी टीका स्वामींनी केली.
व्हॅल्यूटेनमेंट या अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामींनी ही टीका केली आहे. मुलाखत घेणाऱ्या पॅट्रीक बेट डेव्हिड यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आपल्याला एक साक्षात्कार झाल्याचं स्वांमींनी म्हटलं. साक्षात्कार होत असल्यानेच आपण गांधी आणि नेहरुंबद्दल वक्तव्य करत असल्याचं स्वामींनी मुलाखतीत सांगितलं. नंतर त्यांनी याच साक्षात्कारामुळे आपण मोदींबद्दल बोलत असल्याचं म्हटले. स्वामींनी आपल्याला होणाऱ्या साक्षात्कारामुळे मी गांधींबद्दल चांगलं बोलतो असं सांगतानाच त्यांचे वंशज असणाऱ्या नेहरुंबद्दल मला फारसं चांगलं बोलता येत नसल्याचं स्पष्ट केलं.
स्वामींच्या या खुलाश्यावर डेव्हिड यांनी मोदींचा उल्लेख करत प्रश्न विचारला. तुम्ही त्यांना ७० च्या दशकापासून ओळखता आणि त्यांना ब्लंट म्हणजेच बेधकडपणे वक्तव्य करणारा पंतप्रधान असं संबोधता. एकदा तुम्ही साधे, अनुभव नसणारे अर्थतज्ज्ञही म्हटलं होतं. मात्र एकेकाळी तुम्ही स्वत: मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यामुळेच जर आज तुम्हाला भारताचे अर्थमंत्री पद दिलं तर तुम्ही चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेला कसं पुढे घेऊन जाल?, असा प्रश्न स्वामींना विचारण्यात आला.
तुम्ही मोदींना ७० च्या दशकापासून ओळखत असल्याचा उल्लेख असणारा हा प्रश्न ऐकल्यावर स्वामी हसले आणि त्यांनी, “ते माझे मित्र आहेत,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना ब्लंट आणि फार उत्साह नसणारे अर्थतज्ज्ञ आहेत असं आपण म्हणालोच नव्हतो असंही स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेसंदर्भात कळत नाही, असं म्हटल्याचं सांगितलं. यावर पुन्हा डेव्हिड यांनी प्रश्न तोच आहे की तुम्ही अर्थमंत्री असता तर भारतीय अर्थव्यवस्था कशी पुढे नेली असती?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मागील दीड वर्षांपासून सुरु असणाऱ्या करोना साथीचा संदर्भ देताना अर्थमंत्रालयातील लोकांचा आय क्यू म्हणजेच बुद्धिगुणांक कमी असल्याचा टोला लगावला. मी पंतप्रधान मोदींचा जुना मित्र असल्याने मला ठाऊक आहे की त्यांना कमी आय क्यू असणारे लोक आवडतात. त्यांना त्यांची आज्ञा मानणारे लोक आवडतात. ही त्यांची नाजूक बाजू आहे. लोकांनी त्यांच्यासाठी काम करावं असं त्यांना वाटतं. स्वतंत्र पद्धतीने काम करणारे लोक मोदींना आवडत नाही. त्यामुळेच त्यांनी मला दूर ठेवलं आहे, असं स्वामी म्हणाले.
पुन्हा अर्थव्यवस्थेसंदर्भातील प्रश्नावर बोलताना स्वामींनी सध्या करोनाच्या कालावधीमध्ये भारताचा जीडीपी सकारात्कम ठेवण्यासाठी धडपड सुरु असल्याचं दिसत आहे. कामगार आणि मध्यम वर्गीय लोकांच्या कमाईमध्ये खूप मोठा खड्डा पडलाय. अनेक शोरुममध्ये गाड्यांची संख्या बरीच असली तरी खरेदी करण्यासाठी ग्राहकच नाहीयत कारण गाड्यांना मागणीच नाहीय, असं स्वामी म्हणाले. देशामध्ये या गोष्टींची मागणी निर्माण केली पाहिजे. मागणी तेव्हाच निर्माण होते जेव्हा लोकांच्या खिशामध्ये पैसा असतो. अर्थव्यवस्था सुधारण्यासंदर्भातील पहिला सल्ला देताना लोकांकडे अधिक पैसा रहावा यासाठी अमेरिकेने केलेल्या उपाययोजनांचा संदर्भ दिला. दुसरा सल्ला देताना व्याज दर कमी करावेत असं स्वामींनी म्हटलं आहे. अमेरिकेमध्ये दोन टक्के व्याजदर आहे तर दुसरीकडे भारतामध्ये एखाद्या उद्योजकाला कर्ज घ्यायचं असेल तर १२ टक्क्यांनी कर्ज घ्यावं लागतं. बँका आणि इतर संस्थांच्या माध्यमातून ही टक्केवारी १५ पर्यंत जाते. व्याजदर कमी असेल तर नवीन उद्योजक पुढाकार घेतील आणि नव्या उद्योगांना चालना मिळेल. नवीन उद्योगांमुळे सर्वसामान्य नागरिक पैशांची बचत करण्याऐवजी पैसे खर्च करण्याला प्रधान्य देतील.
तिसरा सल्ला देताना स्वामींनी मूलभूत सेवा उभारण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. रस्ते अधिक प्रमाणात बांधावेत असं स्वामी म्हणाले. असं केल्याने लोकांना रोजगार मिळेल. मजुरांना पैसे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोटा छापल्या जातील. नोटा छापणे काही मोठी गोष्ट नाहीय कारण आपण कोणाचे कर्जदार नाही आहोत, असंही स्वामी म्हणाले. अन्य एक सल्ला देताना आयकर रद्द करावा असंही स्वामी म्हणाले. देशातील केवळ दोन ते तीन टक्के लोक आयकर भरतात आणि आयकर भरावा लागू नये म्हणून अनेकजण वेगवेगळे मार्ग शोधत असतात. आता आयकर बंद केला तर सरकारी खर्चासाठी पैसा कुठून येणार असा प्रश्न असेल तर अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून पैसा उभा करता येईल असं स्वामी म्हणाले.

Leave a Reply