अद्यापही नागपुरात बिबट्या सापडलेला नाही

नागपूर : ३१ मे – शहरातील आयटी पार्क परिसर ते गायत्रीनगरदरम्यान शुक्रवारी सकाळी अनेक नागरिकांनी बिबट्या बघितल्याचा दावा केला होता. इतकेच नाही तर बिबट्याने पंजा मारल्याचेही अनेकांनी सांगितले. यानंतर वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम राबविली. मात्र अद्याप त्या बिबट्याचा सुगावा लागलेला नाही.
शुक्रवारी सकाळी आयटी पार्क परिसरात वनविभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्यात आला. शनिवारीही शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, प्रयत्न करूनही वनविभागाच्या हाती बिबट्या लागलाच नाही. मात्र, एका आयटी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरात दर्शन झाल्याने या परिसरात त्याचा संचार असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभर चकमा देणारा बिबट रात्री २.१५ वाजता इंद्रपरी सॉफ्टवेअर कंपनीच्या वॉल कंपाउंडवरून आत जाताना ट्रस्ट सिस्टिम अँण्ड सॉफ्टवेअर कंपनीचे सुरक्षा रक्षक ओमप्रकाश नायडू यांनी पाहिला. सदर घटना सीसीटीव्हीतदेखील कैद झाली. दरम्यान या परिसरात ज्या ठिकाणांहून बिबट प्रवेश करू शकतो, त्या मार्गांची पाहणी करीत तिथे कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तब्बल १२ कॅमेरे नव्याने वनविभागाने लावले असून, त्यादृष्टीने युद्ध पातळीवर वनकर्मचारी तपास करीत आहेत.हा बिबट ज्या मार्गाने आत शिरला त्या ठिकाणी नव्याने सहा कॅॅमेरे लावण्यात आले. तर एनपीटीआय परिसरात सहा कॅमेरे लावण्यात आले. काही दिवसांपूर्वी अंबाझरी जैवविविधता उद्यान परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले. तसेच अधूनमधून त्याचे दर्शनही होत असे. आता गायत्रीनगर परिसरात बिबट दिसला. अंबाझरी परिसरातील बिबट आणि गायत्री नगरातील बिबट एकच आहे का याचा तपास वनविभाग घेत आहे. त्यासाठी पांढराबोडी परिसरात सहा कॅमेरे बसविण्यात आले आहे.

Leave a Reply