औरंगाबाद : ३० मे – अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले, अशी घणाघाती टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथील प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम ओस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते. मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना चव्हाण यांनी राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याचा संदर्भ दिला. मोदी सरकारच्या कारभारातून या गाण्याचे स्मरण होते, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
मागील सात वर्षांत देशाला काय मिळाले, हे सांगताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, फर्ड्या वक्त्यांनाही लाजवेल, अशी दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला. दक्षिण भारतीय चित्रसृष्टी, बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट मिळाले. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या समारोहांना मागे टाकतील, असे शाही इव्हेंट मिळाले. लोकशाहीची मूल्ये आणि घटनात्मक अधिकारांची गळचेपी मिळाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, प्रसारमाध्यमांवर निर्बंध मिळाले, दडपशाही मिळाली. संवैधानिक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांचा गैरवापर मिळाला. ढोंगी राष्ट्रवाद व उन्मत्त-आंधळ्या धर्मप्रेमाच्या आडून ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण मिळाले, या शब्दांत त्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त केली.
मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली. आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त आणि फक्त निवडणूक जिंकणे, हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली, असे ते पुढे म्हणाले.
नोटबंदी, जीएसटी, आर्थिक अव्यवस्थापन आणि कोरोनावर नियोजनशून्य उपाययोजना, अशा एका पाठोपाठ एक देश उद्ध्वस्त करणाऱ्या घोडचुका मिळाल्या. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून खा. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे आणि वरून विरोधकांचीच हेटाळणी करणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले. ढोबळमानाने हीच मागील सात वर्षांमधील देशाची मिळकत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात या सरकारची अकार्यक्षमता, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चव्हाट्यावर मांडला गेला आहे. भलेही आम्ही भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक असू, पण स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे आणि त्यातून होणारी अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात, अशी व्यथा चव्हाण यांनी मांडली.
काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, इतिहास आहे. देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक महान नेत्यांचा वारसा आहे. पण भाजपकडे यातलं काहीच नाही. ना गौरवशाली इतिहास आहे, ना परंपरा आहे, ना वारसा आहे. या न्युनगंडाने भाजप पछाडली असून, आम्हीसुद्धा काँग्रेसपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी काही तरी ऐतिहासिक करण्याचा आव ते नेहमी आणत असतात. पण इतिहास घडवण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भविष्याचे नियोजन असावे लागते. भाजपकडे नेमका त्याचाच अभाव आहे. केवळ भाषणे, स्टंट आणि इव्हेंट करून इतिहास घडत नाही, हे भाजपने समजून घेतले पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर चढवला.
इतिहास घडवण्याच्या नादात या सरकारने इतिहासात कधीही आली नव्हती, अशी वेळ देशावर आणली. सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर उणे ८ वर नेला. दरडोई उत्पन्नात बांग्लादेश सारखा छोटा देश भारतासमोर निघून गेला आहे. भारतातील ‘बॅंक क्रेडिट ग्रोथ’ मागील ५९ वर्षांतील सर्वात निच्चांकी पातळीवर घसरली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन हवेतच विरले. उलट बेरोजगारीचा प्रथमच दोनअंकी म्हणजे ११.३ टक्क्यांवर नेला. कोरोना काळात १२ कोटी २० लाख रोजगार हिरावले गेले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना देशात मात्र पेट्रोल आणि डिझेलने ऐतिहासिक दरांची नोंद केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपयांवर नेली, असा मोदी सरकारच्या असंख्य अपयशांचा पाढा चव्हाण यांनी यावेळी वाचला.
तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीच्या अंगणात सहा महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा आणि शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवण्याचा प्रकार देशाने पहिल्यांदाच अनुभवला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे अश्रू पुसायलाही नरेंद्र मोदी यांना कधी वेळ मिळाला नाही. महाराष्ट्राला तर त्यांनी नेहमी दुय्यम वागणूक दिली. उद्घाटने आणि निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त ते महाराष्ट्रात फारसे कधी फिरकले नाही. तौक्ते वादळानंतर पंतप्रधान गुजरातची पाहणी करतात, त्यांना मदतही जाहीर करतात. पण महाराष्ट्राची दखल घेतली जात नाही. मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत की काय, अशी शंका त्यांच्या कारभारावरून जाणवते, असा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.