अमरावती : २९ मे – अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पर्यायी स्मशानभूमी व गॅस दाहिनीची व्यवस्था मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या गॅस दाहिने मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होण्याच्या तक्रारी उद्भवल्या. आज तिसरी गॅस दाहिनी लावल्यावरुण मनसे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमी परिसरात तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे त्याचा धूर आणि स्मशानभूमीतील राख उडून येथील रहिवासी भागात येत आहे. याविरोधात परिसरातील नागरिक तीन महिन्यांपासून तक्रार करत आहे. याविरोधात परिसरातील नागरिकांचा रोष उफाळून आला असताना आता या स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी पोचली. याची माहिती मिळताच परिसरातील महिला सकाळी स्मशानभूमीत पोचल्या. तसेच याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांना मिळताच दोघेही स्मशानभूमीत पोचले.
दोन दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी परिसरातील नागरिकांसह स्मशानभूमीसमोर मूक आंदोलन केले होते. आज स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी येताच परिसरातील महिला चिडल्या होत्या. स्मशानभूमीत गोंधळ सुरू असताना या प्रभागातील भाजपचे चारही नगरसेवक पोचले. तसेच मनसे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने स्मशानभूमीत पोचले. स्मशानभूमीत नव्याने आलेली शवदाहिनी मनसे आणि भाजप कार्यकर्त्यानी खाली फेकली. यानंतर नवीन शवदाहिनी साहित्याचीदेखील तोडफाड करण्यात आली.
काही साहित्य लगतच्या नाल्यात फेकण्याचा प्रयत्नही या आंदोलकांकडून करण्यात आला. पोलिसांसमोर तोडफोड सुरू असताना पोलिसांनी कोणालाही हटकले नाही.