संपादकीय संवाद – पोलिसांनी संशयित आरोपीला मारहाण करणे चुकीचेच

जालना आणि गोंदिया येथे कथित आरोपींना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची प्रकरणे सध्या प्रचंड गाजत आहेत. गोंदियात मारहाण झालेल्या आरोपीचा कोठडीतच मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाला एकदमच वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षकासह तीन शिपायांना अटक करण्यात आली आहे तर एक पोलीस उपनिरीक्षक फरार झाल्याची माहिती आहे. जालन्यात तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारवर संतप्त आहे.
पोलिसांनी आरोपींना मारहाण करण्याच्या घटना आपल्या देशात नवीन नाहीत यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. वस्तुतः पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा शारीरिक इजा करता येत नाही असे करण्याला कायद्याने बंदी आहे. तरीही पोलीस कायदा हातात घेऊन मारहाण करतातच ज्यावेळी या मारहाणीचा अतिरेक होतो त्यावेळी मग आरोपी गंभीर जखमी होणे किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडणे असे प्रकार घडतात. त्यात मग पोलिसांची चौकशी होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतात प्रसंगी अश्या पोलिसांना शिक्षा होते आणि त्यांची नोकरीही जाते. तरीही पोलीस कोठडीत आरोपी असताना मारहाण करण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाही.
कायद्यानुसार कोणताही संशयित आरोपी हा गुन्हा सिद्ध होईपर्यंत संशयितांचा असतो त्याला कोणतीही शारीरिक इजा करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. एखाद्या ठिकाणी आरोपी हल्ला करणार असेल किंवा पोलिसांच्या हातातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर अश्या वेळेसच फक्त मारहाण करण्याची किंवा प्रसंगी गोळी झाडण्याची परवानगी असते. अन्यथा एखाद्या ठिकाणी एखाद्या मोर्च्यात किंवा दंगलसदृश्य परिस्थितीत पोलिसांना शारीरिक बळाचा वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर शारीरिक बळाचा वापर करण्यापूर्वी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. मग लाठीमार, अश्रूधूर पाण्याचा फवारा मारणे आणि मग शेवटी गोळीबार हे मार्ग अवलंबता येतात.
मात्र कायदेशीर तरतूद असली तरी कायदा हातात घेण्याची पोलिसांची मानसिकता वाढते आहे. कोरोना काळात लॉक डाऊन असताना घराबाहेर निघालेल्या नागरिकांवर पोलिसांनी अनेकदा बळाचा वापर केल्याचे व्हिडीओ बघायला मिळतात. अनेकदा या प्रकरणात पोलिसांनी उठाबशा काढायला लावणे, बळजबरीने शारीरिक व्यायाम करायला लावणे. असे प्रकार केल्याचेही आढळून आले आहे. हे सर्व प्रकार म्हणजे कायदा हातात घेण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. मग अतिरेक झाला की त्या पोलिसांवर गुन्हे दाखल होतात आणि प्रसंगी नोकरीही मुकावे लागते.
असे प्रकार का व्हावेत याचा विचार होणे गरजेचे आहे. पोलीस महासंचालक दर्जाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या मते पोलीस हेदेखील शेवटी माणूसच आहेत. आणि कामाच्या ताणातून बरेचदा असे प्रकार घडतात. असा त्यांचा दावा आहे. हा दावा बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा ठरेल मात्र कामाच्या तणावातून का होईना पोलिसांनी कायदा हातात घेणे चुकीचेच आहे. या मुद्द्यावर समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. असे न झाल्यास ती नव्या अराजकाची सुरुवात ठरू शकते.

अविनाश पाठक

Leave a Reply