संपादकीय संवाद – चंद्रपूरची दारूमुक्ती – समर्थकांनी विचार करायला हवा

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी राज्य शासनाने उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दारूबंदी व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी एका काळात प्रचंड मोठे आंदोलनही केले होते. त्यालाच प्रतिसाद देत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने ही दारूबंदी लावली होती. मात्र ही दारूबंदी उठवण्यात यावी अशी मागणी त्या काळापासूनच तत्कालीन विरोधी पक्ष करीत होता. हा पक्ष आता महाआघाडीचा घटक असल्यामुळे संबंधित मंत्र्यांनी पुढाकार घेत ही दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले आहे.
ही दारूबंदी उठवताना देण्यात आले आहे ते अत्यंत हास्यास्पद असे आहे. दारूबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याची तक्रार केली जाते आहे. तसे बघता चोरी करणे दरोडे टाकणे, पाकीटमार करणे हादेखील अनेकांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग ते उपाशी राहू नयेत म्हणून चोरी आणि दरोडेखोरीला देखील सरकर्मण्यता द्यायची का? असा प्रश्न निर्माण होतो.
आजही हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर मृतकाच्या पार्थिव देहाला अग्नी दिला जातो. मृतकाचे नातेवाईक मृतदेह घेऊन स्मशानभूमीत येतात तेव्हा अग्नी देण्यासाठी त्यांना घाटावर लाकडे आणि गोवऱ्या विकत घ्याव्या लागतात तिथे लाकडे आणि गोवऱ्या विकणाऱ्या कंत्राटदाराचा तो पोटापाण्याचा धंदा आहे त्यामुळे तो कंत्राटदार दररोज घाटावर जास्तीतजास्त मृतदेह येऊ दे अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करत असणार हे नक्की. मात्र त्याचे पोट भरावे म्हणून जास्तीतजास्त लोकांचे मृत्यू व्हावे अशी अपेक्षा करणे कितपत योग्य ठरेल याचाही विचार व्हायला हवा. दारूच्या धंद्यात गुंतलेल्यांचे पोट भरावे यासाठी दारू विकण्याची परवानगी द्या असे म्हणणे हा त्यातलाच एक प्रकार म्हणावा लागेल.
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास तिथे चोरटी दारूविक्री आणि चोरटी कोळसाविक्री हे मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग मानले जातात. असा चोरटा धंदा करणारे तिथल्या समाजजीवनावरच नव्हे तर राजकारणावरही प्रभाव टाकत असतात. हा धंदा करणाऱ्या मंडळींचा पैसा निवडणुकांमध्ये एखाद्याचा विजय किंवा पराभव निश्चित करत असतो असे बोलले जाते. हे जर खरे असेल तर सुधीर मुनगंटीवारांनी आग्रह धरून लावलेली दारूबंदी हटवण्यामागे ज्या घटकांचा आणि नेत्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांच्या हेतूंबद्दलही नजसामान्यांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते हा धोका लक्षात घ्यायला हवा. ज्यामुळे गुन्हेगारी वाढते अश्या व्यवसायातून येणार पैसा जर निवडणुकांवर आणि जनमतावर प्रभाव टाकणार असेल तर ही चिंतेचीच बाब मानवी लागेल. दारूमुक्तीचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी याबाबत विचार करायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply