भंडारा : २८ मे – आई वडिलांनी मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्यामुळे 16 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात अल्पवयीन तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेत आयुष्याची अखेर केली. नदीत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भंडारा शहराला लागून वाहत असेलल्या वैनगंगा नदीत उडी घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये संबंधित कुटुंब राहतं. मयत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची इच्छा असताना आई वडिलांनी मात्र नकार दिला.
आई वडिलांनी केलेल्या मनाईमुळे तरुणीला राग आला. तिने थेट शहराजवळून वाहत असलेल्या वैनगंगा नदीचे तीर गाठले. रागाच्या भरात नदीत उडी घेत तिने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरुणीला नदीत उडी घेताना काही जणांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. एका तासानंतर नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.