भुईमुगाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी केली दगडफेक

बुलडाणा : २८ मे – बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळं बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले असून भुईमुगाला अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज केलेल्या दगडफेकीत दोन शेतकऱ्यांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. आज केवळ ३२०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याचवेळी विघ्नंसंतोषी लोकांनी शेतकऱ्यांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. उत्तरादाखल शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलीसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला. दसरकर यांच्या हातावर दगड लागला. तर शेतकऱ्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचे डोके फुटले. त्याचप्रमाणे तेथील उपहारगृहातील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं अतिरिक्त पोलीस कुमक मागवली.
पोलिसांच्या एका पाठोपाठ एक अशा तीन गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकऱ्यांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली होती. कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील अंबुलकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर एसडीपीओ अमोल कोळी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर वातावरण निवळले.

Leave a Reply