नागपूर : २६ मे – करोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बालकांसाठी शहरात २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवा, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला केली. यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटतर्फे सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक घेतली. तिसऱ्या लाटेची तयारी व म्युकरमायकोसिसच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज करताना विविध वयोगटांचा विचार करावा. बालकामुळे त्यांच्या पालकांचीदेखील व्यवस्था करावी लागेल. वयोगटानुसार गरजा लक्षात घेऊन व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ग्रामीण भागातील स्थितीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार समीर मेघे व आमदार टेकचंद सावरकर यांच्याशी चर्चा केली.
म्युकरमायकोसिसच्या अर्थात काळी बुरशी रुग्णांचे स्क्रिनिंग लवकर केल्यास तातडीने उपचार करून दिलासा देणे शक्य आहे. कॉल सेंटरची स्थापना करून वेळेवर उपचाराची योजना व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शस्त्रक्रिया विभाग वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीला मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, सत्तारुढ पक्षनेते अविनाश ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, सचिव डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.