नवी दिल्ली : २५ मे – तौते चक्रीवादळानंतर अवघ्या आठवड्याभरातच भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा एक अतीतीव्र चक्रीवादळ धडकणार आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते धडकलं, तर आता २४ तासांहून कमी कालावधीमध्ये ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. प्रामुख्याने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असून उत्तर ओडिशा किनारपट्टीजवळ असणाऱ्या धामरा बंदरावर चक्रीवादळ आपला लँडफॉल करणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आज संध्याकाळीच बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ आपलं आक्राळविक्राळ रुप धारण करणार असून उद्या म्हणजेच बुधवारी २६ मे रोजी सकाळीच ते उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पोहोचणार आहे. त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला असून किनारी भागामध्ये बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, कोस्ट गार्डसह सर्व बचाव यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असणाऱ्या धामरा बंदरावर यास चक्रीवादळाचा लँडफॉल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या विभागीय हवामान विभागातील वैज्ञानिक डॉ. उमाशंकर दास यांनी लँडफॉलाच केंद्रबिंदू धामरा आणि चंदबली जिल्ह्याच्या मधे कुठेतरी असेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, यासचा लँडफॉल धामरा बंदराजवळ असला, तरी त्यामुळे सर्वाधिक फटका आणि नुकसान हे चंदबली जिल्ह्याचं होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्यूंजर मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. यास चक्रीवादळाच्या मार्गामध्ये येणाऱ्या प्रदेशात मुसळधार पाऊस आत्तापासूनच सुरू झाला असून तो पुढेही कायम राहणार आहे. ओडिशाच्या केंद्रपारा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यांमध्ये ८० किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र, अतीतीव्र स्वरूप धारण करून धामरा बंदराजवळ लँडफॉल करणाऱ्या या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा लँडफॉल होण्याच्या आधी आणि नंतर ६ तास बसणार आहे. मोठमोठे वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मोहपात्रा यांनी दिली आहे. त्यामुळे लँडफॉलचे आधीचे ६ तास आणि नंतरचे ६ तास चक्रीवादळाचं थैमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी गृहराज्यमंत्री डी. मिश्रा यांना उत्तर ओडिशाच्या भागांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बालासोरकडे रवाना केलं आहे. आत्तापर्यंत ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून मंगळवारी दुपारपर्यंत बचावकार्य सुरू राहील असं सांगण्यात आलं आहे.