मुंबई : २५ मे – भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर केलेल्या भाष्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘भूत आणि भूताटकी ही नेमकी कसली वक्तव्य आहेत? रोज नुसते १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवली असे तुमचे म्हणणे असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही करत नाहीय. पण भाजपने जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराच आशीष शेलार यांनी राऊत यांना लगावला आहे.
राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले होते. राज्यपालांना दिलेली १२ आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावर शेलार यांनी भाष्य केले आहे.
खासदार राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना आशीष शेलार म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचे काम केले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जबाबदार धरले जाते. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, यांना राजकारणाचा महारोग जडला आहे.’
१२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबतची यादी महाविकासघाडीतील मंत्री नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यानच्या काळात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे या १२ आमदारांच्या नावाची यादी मागितली होती. त्यानंतर ही अशी यादी उपलब्ध नसल्याचे सचिवालयाने स्पष्ट केले होते.